Ashok Saraf : गेली अनेक दशकं मराठी सिनेविश्वावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सध्या त्यांच्या ‘अशी ही जमवा जमवी’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. वयाच्या ७७ व्या वर्षी सुद्धा त्यांनी या सिनेमाच्या प्रमोशन प्रक्रियेत तेवढ्याच उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. यानिमित्ताने एका मराठी अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
अशोक सराफ यांनी काही महिन्यांपूर्वीच छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. सध्या ते ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. यामध्ये अभिनेत्री नेहा शितोळे फुलराणी या अशोक मामांच्या मदतनीसाची भूमिका साकारत आहे. अभिनेत्रीने नुकतीच तिच्या लाडक्या अशोक मामांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
अशोक सराफ ‘अशी ही जमवा जमवी’ या सिनेमाच्या प्रमोशनिमित्ताने सर्वत्र फिरत असताना, नेहाला अशोक मामांना स्वत:च्या हातचं खाऊ घालण्याची संधी मिळाली. खऱ्या आयुष्यात सुद्धा त्यांनी कायम हातात हात घेऊन मार्गदर्शन केल्याने नेहाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
अभिनेत्री नेहा शितोळेची पोस्ट
ज्यांच्या डब्यातला खाऊ खाऊन काम करायची ऊर्जा मिळते, त्यांना आपल्या शहरात… घरासारख्या भासणाऱ्या कामाच्या जागेत, स्वतःच्या हाताने खाऊ घालण्याचं सुख आणि भाग्य काही औरच आहे. लवकर परत ये असं ‘अशोक मामा’ जसं फुलराणीला सांगतात तसंच माझ्या प्रगतीवर लक्ष ठेऊन अजून चांगलं काम करत राहा हे ते खऱ्या आयुष्यातही हात हातात घेऊन हक्काने सांगतात… हे प्रेम, हा आशीर्वाद असाच मिळत राहो. निमित्त होतं ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटाच्या प्रमोशनचं… खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी चित्रपट चित्रपटगहांमध्ये जाऊन पाहा… मामा Rocks…!

दरम्यान, नेहा शितोळेने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘अशोक मा.मा.’ ही मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर रात्री ८:३० वाजता प्रसारित केली जाते. तर, ‘अशी ही जमवा जमवी’ या सिनेमात अशोक सराफ व वंदना गुप्ते यांच्यासह चैत्राली गुप्ते, सुनील बर्वे, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर आणि नवोदित कलाकार तनिष्का विशे व ओमकार कुलकर्णी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.