ज्येष्ठ मराठी अभिनेते महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पद्म पुरस्कारांची घोषणा यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली होती. सध्या संपूर्ण कलाविश्वातून या मानाच्या पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. नुकताच ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी निवेदिता यांनी अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘नवरा माझा नवसाचा’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘वेड’ अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मालिका असो, सिनेमा असो किंवा नाटक त्यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
अशोक सराफ यांना जाहीर केलेल्या पद्मश्री पुरस्काराविषयी निवेदिता सराफ म्हणाल्या, “पद्मश्रीसारखा मोठा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना जाहीर झाला यासाठी मी खरोखरच केंद्र सरकारची खूप आभारी आहे. मला असं वाटत होतं की, हा पुरस्कार थोडा आधी मिळायला हवा होता पण, ‘देर आए दुरुस्त आए’ असं म्हणावं लागेल. कारण, त्यांचं कर्तृत्व खरंच खूप मोठं आहे. जेव्हा पूर्ण मराठी चित्रपटसृष्टी डबघाईला आली होती तेव्हा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांनी तिला जिवीत ठेवलं, ज्यामुळे आज आपण हे सगळे दिवस बघतोय…मार्चमध्ये आता पुरस्कार सोहळा पार पडेल. त्यानंतर सेलिब्रेशन होईल.”
यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना अभिनेत्री म्हणाल्या होत्या, “हा एकट्या अशोकचा सन्मान नाहीये, हा महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकाचा सन्मान आहे. कारण, त्यांनी नेहमी अशोकवर प्रेम केलं. त्यांच्या अभिनयावर प्रेम केलं. त्यांची जी अविरत मेहनत आहे… इतक्या वर्षांची त्याचं सार्थक झालं. अशोकने केवळ एकाग्रतेने अभिनय एके अभिनयच केला. त्या सगळ्याची ही पोचपावती आहे. मी प्रेक्षकांची खूप ऋणी आहे, महाराष्ट्राच्या जनतेची आणि केंद्र सरकारची कारण, ही आम्हा कुटुंबीयांसाठी खूपच आनंदाची बाब आहे.”
दरम्यान, निवेदिता सराफ यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. तर, काही दिवसांपूर्वीच त्या ‘फसक्लास दाभाडे’ या सिनेमात झळकला होत्या.