‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात यंदा पद्मश्री महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या विविध मालिकांमधल्या कलाकारांनी एकत्र येऊन या ज्येष्ठ अभिनेत्यासाठी खास परफॉर्मन्स सादर केला. अशोक सराफ यांच्या गाजलेल्या चित्रपटातील गाण्यांवर सादरीकरण करण्यात आलं. यानंतर त्यांना मंचावर आमंत्रित करून त्यांचं पत्नी निवेदिता सराफ यांच्यासह आणखी काही नायिकांनी औक्षण केलं.
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अशोक सराफ यांच्या पत्नी व ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या, “खरोखरच विनोद करणं आणि लोकांना हसवणं हे सर्वात कठीण आहे आणि अशोकच्या भाषेत सांगायचं झालं, तर विनोद हा नेहमी गांभीर्याने करावा लागतो… जो त्याने आयुष्यभर केला. अशा कलाकाराला महाराष्ट्रभूषण मिळणं ही मोठी गोष्ट आहे. कारण, मला वाटतं अशोक हा पहिला अभिनेता आहे ज्याला महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय आज नाना पाटेकर यांच्यानंतर आठ वर्षांनी आपल्या महाराष्ट्रात एका अभिनेत्याकडे म्हणजेच अशोककडे आता पद्मश्री पुरस्कार सुद्धा आला आहे.”
“आपण लहानपणी परिकथांमध्ये वाचतो त्या जादूगाराचा प्राण त्याच्या गळ्यातल्या ताईतात आहे किंवा असं काही… मी म्हणेन, तसा अशोकचा प्राण हा त्याच्या प्रेक्षकांमध्ये आहे. त्याच्या कलेत त्याचा प्राण आहे. त्याचे प्रेक्षक, त्याच्या प्रेक्षकांच्या टाळ्या ही अशोकची सर्वात मोठी ऊर्जा आहे. आता तो ७८ वर्षांचा होईल आणि तो या वयात डेलोसोपमध्ये ( मालिकेत ) सुद्धा काम करतोय… यासाठी आम्ही सगळेच त्याच्यासमोर नतमस्तक आहोत. माझ्या या सगळ्या कुटुंबाच्या आधारामुळे हे शक्य झालं आहे. सतिश राजवाडे, ‘स्टार प्रवाह’ वाहिनी तुम्हा सर्वांची मी खूप आभारी आहे. कारण, तुम्ही एवढं प्रेम अशोकला दिलंत, आम्हाला नेहमी पाठिंबा दिलात, हे प्रेम असंच कायम राहूदेत.” अशा भावना यावेळी निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, या सोहळ्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा ‘सर्वोत्कृष्ट आई’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याशिवाय त्यांच्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेला ‘सर्वोत्कृष्ट परीक्षक पसंती मालिका’ हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.