निवेदिता सराफ या गेली अनेक वर्षं त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकत आल्या आहेत. गेली अनेक दशकं त्या विविध नाटकं, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आज मोठं मानधन आकारणाऱ्या निवेदिता सराफ यांना पहिलं मानधन किती रुपये मिळालं होतं याचा खुलासा त्यांनी केला आहे.
आणखी वाचा : निवेदिता सराफ यांना शॉपिंग करताना स्टोअरमध्ये आला वाईट अनुभव, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, ” मी सहा-सात वर्षांची असताना माझी आई ऑल इंडिया रेडिओवर काम करायची. तेव्हा आई तिथे ‘कामगार सभा’, ‘गंमत जंमत’ आणि ‘वनिता मंडळ’ असे तीन कार्यक्रम करायची. त्यावेळी टीव्ही नव्हता. त्यामुळे लोकांना रेडिओ हे माध्यम त्यांच्या खूप जवळचं वाटायचं. आकाशवाणीवरील नाटक त्या काळात खूप गाजायची. पु.बा भावे यांची ‘वैरी’ नावाची एक कादंबरी होती आणि त्या कादंबरीवर केशव केळकर यांनी एक नभोनाट्य केलं होतं. त्या नाटकामध्ये मी ‘जग्गू’ ही भूमिका साकारली होती.”
पुढे त्या म्हणाल्या, या नाटकात माझ्या वडिलांची भूमिका कमलाकर सारंग करायचे आणि माझ्या आईची भूमिका नीलिमा ताईंनी केली होती. रेडिओवरील या नाटकासाठी माझं पहिलं पेमेंट आलं ती माझी पहिली कमाई होती असं आपण म्हणू शकतो. त्यावेळी त्याचे मला पाच-दहा रुपये मिळाले असतील. आता मला तो आकडा स्पष्ट आठवत नाही.” निवेदिता सराफ यांचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे.