Palak Sidhwani: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही विनोदी मालिका मागील १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. १६ वर्षात अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली. बरेच जुने कलाकार सोडून गेले आणि नवीन आले. या मालिकेतील काही कलाकारांनी निर्मात्यांवर मालिका सोडताना आरोपही केले होते. आता याच कारणाने पुन्हा एकदा या मालिकेची चर्चा होत आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये सोनू भिडेची भूमिका साकारणारी पलक सिधवानी सध्या चर्चेत आली आहे. करार मोडल्याबद्दल निर्माते अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा विचार करत असल्याची चर्चा होती. मात्र, अभिनेत्रीने हे वृत्त फेटाळून लावले होते. पण आता नीला टेलिफिल्म्स या प्रोडक्शन हाऊसने नोटीस पाठवल्याचे निवेदन जारी केले आहे. दुसरीकडे पलकच्या टीमनेही एक निवेदन प्रसिद्ध करून निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
प्रॉडक्शन हाऊसने काय म्हटलंय?
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, नीला टेलिफिल्म्सने म्हटलंय की पलकच्या कराराचे उल्लंघन केले आहे. तिने मालिकेशिवाय इतरत्र कामं केली ज्यामुळे प्रॉडक्शन हाऊसचे नुकसान झाले आहे. लेखी परवानगी नसताना तिने ही कामं केली. यासाठी तिला अनेक वेळा ताकीद देण्यात आली होती, पण तिने नियमांचे उल्लंघन करणे सुरूच ठेवले. त्यानंतर निर्माते नाराज झाले आणि त्यांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली.
पलकची प्रतिक्रिया
निर्मात्यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसवर पलक सिधवानीने प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या टीमने एक स्टेटमेंट शेअर केले आहे. तिने या शोमध्ये पाच वर्ष काम केलं आहे. तिने निर्मात्यांना ८ ऑगस्टला मालिका सोडण्याचा निर्णय सांगितला होता. त्यांनी मला रिझाईनचा मेल करण्यासाठी ऑफिशिअल मेल आयडी देणार असल्याचं सांगितलं होतं, पण तसं काहीच झालं नाही, असं ती म्हणाली. तिने निर्मात्यांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तिला पॅनिक ॲटॅक येतात, त्यामुळे तिला डॉक्टरांची मदत घ्यावी लागली, असंही तिने नमूद केलं.
“पलकने कोणत्याही कराराचे उल्लंघन केलेले नाही. निर्मात्यांनी तिच्याबद्दल जे काही सांगितलं ते सगळं खोटं आहे. प्रॉडक्शन हाऊसने पलकला बदनाम करण्यासाठी, त्रास देण्यासाठी खोट्या कथा बनवत आहे. प्रॉडक्शन हाऊसने तिच्यावर लावलेले सर्व आरोप पलकने फेटाळले आहेत. तसेच तिने मालिके व्यतिरिक्त जी कामं केली, त्यासाठी तिला प्रॉडक्शन हाऊसने परवानगी दिली होती. तसेच कराराची कॉपी तिला दिली नव्हती,” असं स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. नवभारत टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
पलक सिधवानीने बॉम्बे टाईम्सला सांगितलं की, ती आरोग्यासंबंधित काही कारणांमुळे आणि करिअर ग्रोथमुळे हा शो सोडत आहे. तिने निर्मात्यांबरोबर अनेक मीटिंग्स केल्या, पण तोडगा निघाला नाही. पाच वर्षे काम केल्यानंतर निर्माते असे वागतील, अशी अपेक्षा मला नव्हती. निर्माते शो सोडू देत नाहीयेत, ते मानसिक छळ करत आहेत, असे आरोप पलकने केले आहेत.