‘क्रांती,’ ‘अर्जुन पंडित’सारखे चित्रपट अन् ‘केहता है दिल’, ‘वैदेही’ व ‘इतना करो ना मुझे प्यार’ या मालिकांमध्ये काम करणारी मराठमोळी अभिनेत्री पल्लवी कुलकर्णी सध्या सिनेक्षेत्रापासून दूर आहे. पल्लवीने मुंबई सोडली असून ती कुटुंबासह विदेशात स्थायिक झाली आहे. आपण अभिनय सोडला नाही, तर चांगल्या भूमिका मिळाल्यास नक्कीच काम करणार असंही पल्लवीने म्हटलं आहे. कामासाठी ती मुंबईला प्रवास करण्यासाठी तयार आहे. पल्लवी शेवटची तीन वर्षांपूर्वी एका वेब शोमध्ये दिसली होती.
पल्लवी म्हणाली, “मला कधीच वाटलं नव्हतं की मी मुंबई सोडून जगात इतर कुठेही स्थायिक होईन, पण नियतीच्या मनात कदाचित माझ्यासाठी इतर प्लॅन होते. माझ्या पतीला दुबईमध्ये कामाची चांगली संधी मिळाली. सुरुवातीला मी फार आनंदी नव्हते, पण मी काही आठवड्यांनी तिथे स्थायिक होण्यास तयार झाले. दुबई खूप सुंदर आहे आणि मुंबईपासून फक्त दोन तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे जर मला कामाच्या ऑफर आल्या किंवा मला माझ्या आई-वडिलांना, सासू- सासऱ्यांना भेटायचं असेल तर मी खूप लांब नाही. मला आशा आहे की चांगल्या कामाच्या ऑफर येतील कारण बऱ्याच दिवसांपासून मला अशा प्रकारच्या भूमिका मिळाल्या नाहीयेत.”
मी अभिनय सोडला आहे, असे गैरसमज खूप लोकांना झाले आहेत, असं पल्लवीने सांगितलं. “मला मुलगा झाल्यानंतर आणि माझे पती त्यांच्या करिअरमध्ये चांगले काम करत आहे, त्यामुळे मला माझे करिअर करण्यात काहीच रस नाही, असं खूप जणांना वाटलं. पण माझ्या पतीचे करिअर पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आणि त्यांनी मला माझ्या कामात नेहमीच साथ दिली आहे,” असं पल्लवीने नमूद केलं. इ टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
“मी नेहमीच चांगल्या कामासाठी प्रयत्न करत असते. २०२१ मध्ये, मी महेश मांजरेकर यांच्याबरोबर एक वेब शो केला. अनेक कलाकारांना मी ओटीटीवर काम करताना पाहत आहे. टीव्हीवर काही शो आहेत, जे खूप चांगलं काम करत आहेत. पण ओटीटीमध्येही अनेक संधी आहेत आणि मला चांगल्या ऑफर मिळाल्या तर मला काम करायला आवडेल. ‘इतना करो ना मुझे प्यार’ नंतर, मला काही मनोरंजक ऑफर मिळाल्या नाहीत,” असं पल्लवी म्हणाली.
‘हॅलो छायाजी, मैं…’, जेव्हा कोकणात असलेल्या छाया कदमांना तब्बूने केला होता फोन
४१ वर्षीय पल्लवी कुलकर्णीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने २००७ मध्ये मिहीर नेरूरकरशी लग्न केलं होतं. या जोडप्याला एक मुलगा आहे.