टीव्ही अभिनेत्री पायल घोषने सोशल मीडियावर एक सुसाइड नोट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. ‘मी टू’ चळवळीत बी-टाऊनच्या अनेक अभिनेत्रींनी अनेक सेलिब्रिटींवर गंभीर आरोप केले होते. त्यापैकी एक अभिनेत्री पायल घोष देखील होती. पायलने अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. पण आता मात्र ती सुसाइड नोटमुळे चर्चेत आहे.
“ही मी पायल घोष आहे. जर मी आत्महत्या केली किंवा हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले तर त्याला जबाबदार लोक असतील…” असं पायलने त्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. पण तिने या चिठ्ठीत कोणाचंही नाव लिहिलेलं नाही. त्यामुळे नेमका हा काय गोंधळ आहे ते चाहत्यांनाही समजलं नाही. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत यासंदर्भात विचारलंय आणि काळजी व्यक्त केली आहे.
दुसर्या पोस्टमध्ये तिचा फोटो शेअर करत पायलने लिहिले की, “ओशिवरा पोलीस स्टेशन… पोलीस माझ्या घरी आले होते… मला काही झालं तर ते कोणालाच सोडणार नाही.. माझ्या मानसोपचार तज्ज्ञाला विचारा… मी कोणत्या परिस्थितीत आहे? मी सुशांत नाही, मी पायल घोष आहे, मी मेले तर सर्वांना माझ्यासोबत घेऊन मरेन.”
दरम्यान, पायल अचानक अशा पोस्ट का करत आहे. यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण ‘मीटू’ अंतर्गत ती आरोप करत असल्याचं दिसून येत आहे. पायलने काही मालिका व चित्रपटात काम केलंय.