सध्या सर्वत्र वारीनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून वारकरी विठुरायाच्या नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. दरवर्षी वारीमध्ये अनेक कलाकारही सहभागी होतात. तर यंदाही वारीत काही मराठी कलाकार सहभाग घेऊन त्यांना शक्य होईल तशी सेवा करताना दिसत आहेत. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलेली प्राजक्ता यावर्षी वारीमध्ये सहभागी झाली आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती याबाबतची माहिती तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहे. आता यादरम्यानचे तिचे काही व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा : प्राजक्ता गायकवाडने केला तिच्या नव्या घरात गृहप्रवेश, पाहा घराची खास झलक
प्राजक्ताने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये ती इतर महिलांबरोबर बसून स्वयंपाक करताना दिसत आहे. तर दुसरा व्हिडीओमध्ये ती वारकऱ्यांबरोबर भजन कीर्तनात दंग झालेली दिसत आहे. प्राजक्ताने आणखी एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये ती एका आजींबरोबर अनवाणी होऊन फुगडी खेळताना दिसत आहे. तर फुगडी झाल्यानंतर तिने त्या आजींना वाकून नमस्कारही केला. वारीमध्ये स्वयंपाक करणं, भजन कीर्तनात दंग होणं, फुगडी खेळणं हे सर्व प्राजक्ता खूप एन्जॉय करत आहे.
हेही वाचा : Video: …अन् माईकसमोर बोलता बोलता प्राजक्ता गायकवाडला कोसळले रडू, जाणून घ्या कारण
तिचे हे सगळे व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. ते पाहून नेटकरी तिच्या साधेपणाचं आणि नम्रपणाचं खूप कौतुक करत आहेत.