मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राजकारणी मंडळी, सामान्य जनता आणि लोकप्रतिनिधींसह मराठी मनोरंजनसृष्टीतील काही कलाकारांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अश्विनी महांगडे, हेमंत ढोमे यांच्यानंतर आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनेदेखील या प्रकारावर भाष्य केलं आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या या भूमिकेचा खूप कौतुक झालं. याचबरोबर तिचा चाहतावर्गही खूप वाढला. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती समाजात घडणाऱ्या तिला आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल स्पष्टपणे भाष्य करत असते. आताही तिने या लाठीचार्ज घटनेबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “तू लग्न कधी करत आहेस?” अखेर प्राजक्ता गायकवाडने दिलं उत्तर, म्हणाली…
प्राजक्ताने तिचा ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमधील एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती रागाने बघताना दिसत आहे. हा तिचा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “रक्त उसळलंय…रक्त पेटलंय.” याबरोबरच तिने ‘९६ कुळी मराठा’, ‘अभिमान’, ‘एक मराठा लाख मराठा’ हे हॅशटॅग वापरले आहेत.
आता तिची ही पोस्ट खूप चर्चेत आलेली आहे. या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.