‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रसिद्धीझोतात आली. मालिका, चित्रपट, वेब सीरिज अशा सगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयाशिवाय तिने स्वत:चा व्यवसायही सुरू केला आहे. सध्या अभिनेत्री तिच्या नागपूर दौऱ्यामुळे चर्चेत आली आहे. नागपूर दौऱ्यादरम्यान अभिनेत्रीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची भेट घेतली.
हेही वाचा : कलाकारांची पंगत! ‘रंग माझा वेगळा’ फेम दीपा पोहोचली अनघा अतुलच्या हॉटेलमध्ये; जेवणाच्या चवीबद्दल म्हणाली…
देशभरात २४ ऑक्टोबरला मोठ्या उत्साहात दसरा साजरा करण्यात आला. यादिवशी प्राजक्ता माळीने नागपूरच्या रेशीमबाग मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्याला हजेरी लावली होती. यानंतर तिने राजकीय क्षेत्राशी संबंधित अनेक नेत्यांची भेट घेतली. प्राजक्ताने याबद्दल सोशल मीडिया पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. तिच्या पोस्ट पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. सध्या तिचे नागपूरातील राजकीय भेटीगाठींचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
हेही वाचा : टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉनचा ‘गणपत’ ठरला फ्लॉप, २०० कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाने ७ दिवसांत कमावले फक्त…
प्राजक्ताच्या माळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “तुला अनफॉलो करत आहेत…याचं कारण तुला कमेंट्स वाचून कळालं असेल.” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने कमेंट करत “प्रवेश कधी करतेस?, तारिख पण सांगून टाक आणि मोकळी होऊन जा. ही शेवटची कमेंट तुला आता अनफॉलो करणार” असं लिहिलं आहे. अभिनेत्रीने शेअर केलेले राजकीय भेटीगाठींचे फोटो पाहून तिच्या अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तिने केवळ तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करावं असा सल्ला तिला चाहत्यांनी दिला आहे. याउलट काही नेटकऱ्यांनी अभिनेत्रीचं समर्थन करत तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : ‘ठाकरे’नंतर ‘या’ बायोपिकमध्ये झळकणार नवाजुद्दीन सिद्दिकी; साकारणार ‘या’ अधिकाऱ्याची भूमिका
दरम्यान, प्राजक्ता माळीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वैयक्तिक भेट घेतली. उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील गरबा कार्यक्रमासाठी प्राजक्ताने उपस्थिती लावली होती. याशिवाय नितीन गडकरींच्या घरी प्राजक्ताचं मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आलं. प्राजक्ताला केंद्रीय मंत्र्यांनी अनेक पुस्तकं भेट दिल्याचं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.