‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटांमुळे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे घराघरांत लोकप्रिय झाली. मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्याआधी तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘पवित्र रिश्ता’ सारख्या गाजलेल्या मालिकेत प्रार्थनाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. अभिनय क्षेत्रात जम बसवल्यावर वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीने २०१७ मध्ये अभिषेक जावकरबरोबर लग्न केलं.
लग्नानंतर प्रार्थनाने काही काळ मनोरंजनविश्वातून ब्रेक घेतला होता. परंतु, त्यानंतर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेतून प्रार्थनाने छोट्या पडद्यावर मोठ्या दणक्यात पुनरागमन केलं. यामध्ये तिच्याबरोबर श्रेयस तळपदे, बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘माझी तुझी रेशीमगाठ’मुळे प्रार्थनाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. मालिकेने निरोप घेतल्यावर प्रार्थना आपला नवरा आणि सासरच्या मंडळींबरोबर अलिबागला शिफ्ट झाली. त्याठिकाणी तिने कुत्रे, मांजरी, घोडे असे अनेक प्राणी पाळले आहेत. याबाबत प्रार्थनाने नुकत्याच ‘दिल कें करीब’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
हेही वाचा : वरणभात, आमरस अन्…; मुग्धा वैशंपायनने रामनवमीनिमित्त केला महानैवेद्य, प्रथमेश फोटो शेअर करत म्हणाला…
काही महिन्यांआधी अभिनेत्रीने तिच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमांतून मूल होऊ न देण्याबद्दल भाष्य केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनाने या वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या या निर्णयामागचं कारण सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणते, “माझ्या नवऱ्याला आणि मला प्राणी खूप आवडतात. त्यामुळे आम्हाला मूल नको असं आम्ही ठरवलं होतं. आता आमच्या घरी जे प्राणी आहेत ते सगळे एकूण एक प्राणी आमची मुलं आहेत आणि आम्ही दोघंही त्या सगळ्यांची खूप जास्त काळजी घेतो, त्यांना सांभाळतो. मूल होऊ न देण्याचा निर्णय मोठा होता पण, यात आमच्या घरच्या दोन्ही कुटुंबांनी आम्हाला पाठिंबा दिला, समजून घेतलं.”
हेही वाचा : लग्नाआधी काशी विश्वनाथच्या दर्शनाला पोहोचली ३९ वर्षीय अभिनेत्री, मंदिरात ठेवलेल्या पत्रिकेने वेधलं लक्ष
“माझे सासू-सासरे, आई-बाबा दोन्ही कुटुंबांनी हा निर्णय आमच्यावर सोडला होता. माझ्या नवऱ्याचं प्राण्यांवर प्रचंड प्रेम आहे. एका कुत्र्याला जरी काही झालं तरी आम्ही दोघंही बैचेन होतो. त्या मुक्या जनावराला आपली जास्त गरज आहे त्यामुळे त्यांच्यासाठी जगूया असा विचार आम्ही केला.” असं प्रार्थनाने सांगितलं.
हेही वाचा : “आमच्या शुभूने…”, सलील कुलकर्णींची मुलासाठी खास पोस्ट; त्याचं पहिलं हिंदी गाणं येतंय श्रोत्यांच्या भेटीला
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून प्रार्थना तिचा नवरा अभिषेक आणि सासरच्या कुटुंबीयांबरोबर अलिबागला राहते. त्याठिकाणी त्यांचं आलिशान घर आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ती ‘बाई गं’ या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशीबरोबर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.