Priya Bapat on Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सध्या सुरू आहे. हे पर्व आधीच्या चार पर्वांपेक्षा ब्लॉकबस्टर ठरलं आहे. बरेच मराठी कलाकार या शोबद्दल त्यांची मतं मांडतात. स्पर्धकांच्या खेळावर प्रतिक्रिया देतात. घरात घडणाऱ्या गोष्टींवर त्यांची मतं मांडत असतात, अशातच आता प्रिया बापटने या घरातील तिच्या आवडत्या स्पर्धकांबद्दल सांगितलं आहे.
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बापटने हिंदीतही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मराठीसह हिंदी प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्रियाने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. प्रियाने कधी कधी बिग बॉस बघत असल्याचं म्हटलं आहे. तसेच घरातील तिचे आवडते स्पर्धक कोणते त्यांची नावं तिने घेतली.
प्रिया बापट बिग बॉस बघते का?
बिग बॉस बघतेस का, आणि आवडते स्पर्धक कोण? असे प्रश्न प्रिया बापटला लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत विचारण्यात आले. “आमच्या घरात कधीकधी बिग बॉस पाहतात. मी अगदी नियमित हा शो फॉलो करत नाही. शोच्या सुरुवातीला मी एपिसोड्स बघितले, पण मला खूप त्रास झाला. कारण सारखी कचकच भांडणं पाहायला मला आवडत नाही. त्यामुळे कधीतरी बघते,” असं प्रिया म्हणाली.
प्रियाने घेतली या तीन सदस्यांची नावं
प्रियाने यंदाच्या पर्वाचे जितके एपिसोड पाहिले, त्यावरून तिचे आवडते स्पर्धक कोणते ते सांगितलं. “शो मी जितका पाहिलाय, त्यावरून पॅडी दादा मला आवडतो. तसेच अभिजीत, पॅडी दादा आणि अंकिता हे तिघे आपल्या खऱ्या स्वभावाला आणि मराठी संस्कृतीला जपून खेळतात, असं मला वाटतं. निक्की तांबोळी हिंदी बिग बॉस करुन आली आहे, त्यामुळे ती तसंच खेळते. ती करतेय ते कदाचित बरोबर असूही शकतं, कारण मला तो खेळ फारसा कळत नाही. जर मला बिग बॉसच्या घरात ठेवलं तर योगिताप्रमाणेच मी म्हणेन, ‘बाबा, मला बाहेर काढा,'” असं प्रिया बापट म्हणाली.
प्रिया बापटच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती नुकतीच रितेश देशमुखबरोबर ‘विस्फोट’ या हिंदी चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच बरुण सोबती व अंजली आनंद यांच्याबरोबर ‘रात जवान है’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज ११ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.