आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे करोडो चाहते आहेत. तर ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. तर आता लवकरच तिचा मराठमोळा अंदाज समोर येणार आहे.
‘झी चित्र गौरव पुरस्कार’मध्ये ती सहभागी होणार आहे. इतकंच नाही तर या कार्यक्रमामध्ये ती लावणी ही सादर करणार आहे. कार्यक्रमातील तिचे काही प्रोमोसुद्धा सोशल मीडियावर खूपच चर्चेत आले आहेत. पण रश्मिका मंदाना आणि मराठी गाणी यांचं कनेक्शन खूप जुनं आहे, असं तिने नुकतंच सांगितलं.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिचं आणि मराठी गाण्यांचं हे कनेक्शन उघड केलं. ती म्हणाली, “मी लहानपणी ‘ऐका दाजीबा’ या गाण्यावर नाच केला होता. तेव्हाच माझी मराठी गाण्यांशी ओळख झाली. त्यानंतर आता अनेक वर्षांनी लावणी सादर करत आहे. त्यामुळे या निमित्ताने माझ्या बालपणीच्या सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या आहेत आणि आता ही लावणी करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. कारण मी पहिल्यांदाच लावणी सादर करत आहे. मला आशा आहे की माझा हा नाच तुम्हा सर्वांना आवडेल.”
हेही वाचा : “मी आजही माझ्या एक्सबरोबर…”, रश्मिका मंदानाने तिच्या अफेअरबद्दल केला मोठा खुलासा
हा पुरस्कार सोहळा २६ मार्च रोजी रंगणार आहे. रश्मिका पहिल्यांदाच मराठी गाण्यावर थिरताना दिसणार असल्याने सर्वजण तिला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.