मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत ऋतुजा बागवे हिचा समावेश होतो. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात काम करत ती प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या नवीन घरात प्रवेश केला. नवीन घर तर घेतलं पण आता त्याचा ईएमआय भरण्याचं टेन्शन आलं आहे का? याचं उत्तर तिने दिलं आहे.
ऋतुजा बागवे हिने नुकतंच ठाण्यामध्ये तिच्या स्वतःच्या कमाईतून तिचं पहिलं घर घेतलं. काही दिवसांपूर्वीच तिने त्या घरात गृहप्रवेश केला. ऋतुजा तिच्या या नवीन घराची झलक सोशल मीडियावरून चाहत्यांना दाखवत असते. हे घर घेण्यासाठी तिने अनेक वर्ष साठवलेले पैसे वापरले. तर आता तिने या घराचा ईएमआय भरण्याबद्दल भाष्य केलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “लहानपणापासूनच माझा स्वभाव पैसे साठवण्याचा आहे. जर इतर लोक १०० पैकी ६० रुपये खर्च करत असतील आणि ४० रुपये साठवून ठेवत असतील तर मी ४० रुपये खर्च करते आणि ६० रुपये साठवून ठेवते. हा माझा स्वभाव आहे आणि त्याचा मला आत्तापर्यंत फायदाच झाला आहे. मी खूप आधीपासून इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग, एसआयपी हे सगळं करत आले आहे. बाबांनी मला ते खूप आधीपासून शिकवलं आहे आणि माझ्याकडून करून घेतलं आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणते की ते नसते तर हे सगळं शक्य झालं नसतं. त्यांना माझा सगळा हिशोब माहित असतो. तेच तो बघतात. कुठे इन्व्हेस्टमेंट करायची हे त्यांना अगदी व्यवस्थित माहिती असतं आणि माझ्या पहिल्या कमाईपासूनच त्यांनी मला हे सगळं शिकवलं आहे.”
पुढे ती म्हणाली, “हे सगळं करत असताना मी कधीच माझं मन मारलं नाही. मटेरियलिस्टिक मी आनंद मनात नाही. मला स्वतःला सारखं शॉपिंग करायला आवडत नाही. त्यामुळेही बरेच पैसे वाचतात. मुळातच माझा स्वभाव पैसे वाचवण्याचा असल्यामुळे मला कधीही एमआयचं टेन्शन आलं नाही.” तर आता ऋतुजाचं हे उत्तर आणि तिचा हा स्वभाव याचं तिचे चाहते कौतुक करत आहेत.