Shivani Rangole : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी रांगोळे घराघरांत लोकप्रिय झाली. तिने या मालिकेत अक्षराची भूमिका साकारली आहे. अधिपती तिला अक्षराऐवजी ‘मास्तरीण बाई’ अशी हाक मारतो. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात शिवानीला मास्तरीण बाई अशी नवीन ओळख मिळाली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शिवानीच्या आई राधा रांगोळे यांनी नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे. ‘माणदेशी’ महोत्सव या प्रदर्शनात राधा रांगोळे त्यांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तू सादर केल्या जाणार आहेत. याबद्दल माहिती देताना शिवानी लिहिते, “एक आनंदाची बातमी! रंगराधा क्रिएशन्स’ हा नवीन उपक्रम माझ्या आईने सुरू केलेला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ती स्वतः हाताने तयार केलेल्या Home Decor च्या असंख्य कलात्मक वस्तू ‘माणदेशी’ महोत्सवामध्ये सादर करणार आहे.”
“माझी आई तिच्या आयुष्यातील पहिल्या एक्झिबिशनसाठी सज्ज आहे. लहानपणी माझ्या प्रत्येक स्पर्धेत मला यश मिळवताना बघून तिला किती आनंद होत असेल, हे मला आज तिच्या जागी येऊन बघताना कळतंय! परळकर, भेटूया माणदेशी फेस्टिवलला! ५ ते ९ फेब्रुवारी, नरे पार्क, परळ इथे!” अशी पोस्ट शेअर करत शिवानी रांगोळेने तिच्या आईने सुरू केलेल्या नवीन उपक्रमाची माहिती तिच्या सगळ्या चाहत्यांना दिली आहे.
शिवानीने या पोस्टसह तिच्या आई राधा यांनी बनवलेल्या होम डेकॉरच्या कलात्मक वस्तूंची झलक चाहत्यांना दाखवली आहे. सुंदर डिझाइन केलेल्या प्लेट्स, चहा किंवा कॉफी देणारे ट्रे, फुलदाण्या, वॉल पेटिंग्ज या वस्तूंचे फोटो शिवानीने तिच्या पोस्टमध्ये शेअर केले आहेत.
दरम्यान, शिवानी रांगोळेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने आजवर ‘बन मस्का’, ‘सांग तू आहेस का’, ‘आम्ही दोघी’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ अशा अनेक मालिका तसेच नाटकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय ‘सुभेदार’ या ऐतिहासिक चित्रपटात सुद्धा शिवानी झळकली होती.