‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना चांगलेच आवडत आहेत. तर आता या मालिकेत लवकरच अधिपती आणि अक्षराचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्त शिवानी रांगोळे हिने तिच्या स्वतःच्या लग्नातली एक आठवण शेअर केली आहे.
या मालिकेमध्ये अभिनेत्री शिवानी रांगोळे ही अक्षराच्या आणि ऋषिकेश शेलार हा अधिपतीच्या भूमिकेत दिसत आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय राहून पडद्यामागे घडणाऱ्या गमतीशीर घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतात. नेटकरीही त्यांना चांगला प्रतिसाद देतात. तर आता नुकतंच अक्षरा आणि अधिपती यांच्या लग्नाच्या हळदीच्या भागाचं शूटिंग झालं. त्यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिवानीने तिच्या खऱ्या लग्नातील हळदीबद्दल भाष्य केलं.
विराजस आणि शिवानी यांनी गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधली. त्या लग्नातील आठवणी सांगत ती म्हणाली, “मी आमच्या लग्नात हळद केली नव्हती. पण आमच्या लग्नात खूप मजा आली होती. आमचे जे अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत, जे आम्हाला थिएटरमुळे अनेक वर्ष ओळखतात त्यांनी छान कार्यक्रम आयोजित केला होता. आमच्या घरच्यांनी सगळ्या जुन्या आठवणी सांगितल्या होत्या, आम्ही डान्स केला होता. त्यामुळे इथली हळद आणि हे सगळं वातावरण पाहून मला ते आठवत आहे. पण मी आमच्या या मालिकेतील माझी हळदही खूप एन्जॉय करते आहे.”
तर अक्षरा आणि अधिपती यांच्या लग्नाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. थाटामाटात हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे आता हे लग्न कसं पार पडतंय यात काही ट्विस्ट अँड टन्स येणार का हे पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत.