‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. अभिनेता ओंकार राऊतला या कार्यक्रमामुळे एक वेगळी ओळख मिळाली. हास्यजत्रेचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने ओंकार राऊत, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ओंकार राऊतने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
हेही वाचा : “स्वत:ची लायकी सोडून…”, पूजा सावंतने ट्रोलिंगबद्दल मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “त्या आक्षेपार्ह कमेंट्स…”
ओंकारने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पृथ्वीक प्रताप त्याला बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी एखादे गाणे गाण्याची विनंती करताना दिसत आहे. सर्वांच्या विनंतीला मान देऊन ओंकारने श्रद्धा कपूरसाठी तिचा गाजलेला चित्रपट ‘आशिकी २’ मधील “चाहू मैं या ना…” हे गाणे गायले. अभिनेत्याचा सुंदर आवाज ऐकून सगळेजण थक्क झाल्याचे पाहायला मिळाले.
ओंकारने गाणे गायल्यावर पृथ्वीक आणि त्याने हे गाणे जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि श्रद्धा कपूरला कमेंट्समध्ये टॅग करा असे आवाहन हास्यजत्रेच्या प्रेक्षकांना केले होते. दोघांनी सांगितल्याप्रमाणे या व्हिडीओमध्ये बहुतांश लोकांनी श्रद्धा कपूरला टॅग केले होते. त्यामुळे हा व्हिडीओ तिच्यापर्यंत पोहोचला. श्रद्धा ओंकार राऊतचे गाणे ऐकून भारावली आणि तिने या व्हिडीओवर कमेंट केली.
हेही वाचा : “प्रसूतीनंतर पापाराझींची भीती…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला अनुभव; म्हणाली, “घरी येणाऱ्या भाजीवाल्याने…”
श्रद्धा कपूरने मराठीमध्ये कमेंट करत ओंकार राऊतचे कौतुक केले आहे. “वॉव सुपर किती गोड…मस्त” अशी कमेंट बॉलीवूड अभिनेत्रीने या व्हिडीओवर केली आहे. ओंकारने या कमेंटचा स्क्रीनशॉट काढून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर उत्तर देत त्याने “धन्यवाद आणि खूप!!” प्रेम असे लिहिले आहे. श्रद्धाची कमेंट पाहून हास्यजत्रेच्या कलाकारांनी ओंकार राऊतवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.