झी मराठीवरील ‘चल हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमातील कलाकारांनाही प्रसिद्धी मिळाली आहे. अभिनेत्री श्रेया बुगडेही या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे आणि आज ती मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आता तिची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.
श्रेया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबद्दल अपडेट्स देत असते. त्याचबरोबर तिच्या आयुष्यातील खास व्यक्तींबद्दल प्रेमही ती सोशल मिडियावरून व्यक्त करत असते. तिचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. तर अभिनेता पियुष रानडे याला ती भाऊ मानते. ते भाऊबीज, रक्षाबंधनही दरवर्षी साजरं करतात. आज त्याचा वाढदिवस आहे. यानिमित्त तिने त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहीलं आहे.
आणखी वाचा : मालिका संपताच वल्लीने केलं स्काय डायव्हिंग, अनुभव शेअर करत अभिज्ञा भावे म्हणाली…
श्रेयाने आज तिचे आणि पियुषचे काही फोटो पोस्ट केले. या पोस्टमध्ये श्रेया पियुषचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत तिने लिहीलं, “तू नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहेस आणि तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. जर प्रत्येक बहिणीला तुमच्यासारखा भाऊ असेल तर जग आणखी चांगलं होईल. मोठ्या भावाबरोबर आयुष्य नेहमीच छान असतं. तू माझा खूप चांगला मित्र आहेस. तुझा वाढदिवस साजरा करताना मी तिथे आहे याचा मला खूप आनंद आहे दादू.”
हेही वाचा : “काका, तुम्ही खूप काही दिलंत…”; विक्रम गोखले यांच्या आठवणीत श्रेया बुगडे भावूक
आता तिची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. या पोस्टवर कमेंट करत श्रेयाचे आणि पियुषचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्यातलं हे बहीण-भावाचं नातं त्यांना खूप आवडल्याचं सांगत आहेत.