हिंदी मालिकाविश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री असलेल्या दोन सख्ख्या बहिणींचं अवघ्या ४८ तासांच्या अंतराने निधन झालं आहे. एका बहिणीला कावीळ झाली होती, तर दुसरी बहीण सर्व्हिकल कॅन्सरने ग्रस्त होती. कुटुंबियांनी या दोघींच्या निधनाची माहिती दिली आहे.
अमनदीप सोही व डॉली सोही असं या दोन्ही बहिणींची नावं आहेत. डॉली सोहीचे आज सकाळी वयाच्या ४८ व्या वर्षी सर्व्हिकल कॅन्सरमुळे निधन झाले. तिची बहीण अमनदीप सोही हिचे गुरुवारी काविळीमुळे निधन झाले होते. अमनदीपच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच डॉलीने जगाचा निरोप घेतला. दोघी बहिणींच्या निधनाने कुटुंबियांना धक्का बसला आहे.
‘ई-टाइम्स’ ने दिलेल्या वृत्तानुसार, “आमची प्रिय डॉली आज पहाटे आम्हाला सोडून गेली. आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. आज दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातील,” अशी माहिती अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी दिली. दरम्यान, अभिनेत्रीचा भाऊ मनूने त्याची बहीण आणि टीव्ही अभिनेत्री अमनदीप सोहीचे निधन झाल्याचं सांगितलं होतं. यानंतर काही तासांतच डॉली सोहीच्या मृत्यूची बातमीही आली. डॉलीने तिच्या दोन दशकांच्या टीव्ही करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं.
राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खानने केलं दुसरं लग्न, कोण आहे त्याची दुसरी पत्नी? जाणून घ्या
अमनदीप सोहीचे ७ मार्च रोजी निधन झाले. ‘बदतमीज दिल’मधील तिच्या भूमिकेमुळे अभिनेत्रीला खूप लोकप्रियता मिळाली. “हो, हे खरं आहे की अमनदीप आता या जगात राहिली नाही, तिच्या शरीराने तिची साथ सोडली होती, तिला कावीळ झाली होती,” असं अमनदीपचा भाऊ मनूने सांगितलं होतं.