‘सूर नवा ध्यास नवा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाची पाच पर्व सुपरहिट झाली. तर आता लवकरच या कार्यक्रमाचं सहावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाची नुकतीच घोषणा करण्यात आली. पण आता या आगामी पर्वामध्ये निर्मात्यांनी मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘सूर नवा ध्यास नवा’चं ‘सुर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ हे आगामी पर्व लवकरच सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाच सूत्रसंचालन तेजश्री प्रधान हिने केलं. तर त्यानंतरच्या आतापर्यंतच्या पर्वांचं सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी हिने केलं. पण आगामी पर्वामध्ये स्पृहा जोशी या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून दिसणार नाही.
आणखी वाचा : “मराठी भाषेतून शिकणारी मुलं…”, स्पृहा जोशीने मांडलं स्पष्ट मत, म्हणाली…
‘ढोलकीच्या तालावर’ या रिॲलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच संपन्न झाला. या दरम्यान पुढच्या आठवड्यापासून त्या जागी सुरू होणाऱ्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाचं प्रमोशन करण्यात आलं. तर त्यावेळी या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन स्पृहा जोशी नाही तर रसिका सुनील करणार असल्याची घोषणा करण्यात आली. तर परीक्षकांच्या भूमिकेत अवधूत गुप्ते आणि महेश काळे दिसणार आहेत.
तर आता स्पृहा जोशीची जागा रसिका सुनीलने घेतल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या कार्यक्रमातील स्पृहा जोशीच्या सूत्रसंचालनाचं नेहमीच कौतुक झालं. तर आता ती या आगामी पर्वामध्ये सूत्रसंचालिका म्हणून दिसणार नसल्याने तिचे चाहते निराश झाले आहे. दरम्यान निर्मात्यांनी हा बदल का केला याचं कारण अजून समोर आलेलं नाही. ‘सुर नवा ध्यास नवा’चं हे आगामी पर्व ७ ऑक्टोबर पासून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.