मराठीतील लोकप्रिय संगीत कार्यक्रम ‘सूर नवा ध्यास नवा’चे सहावे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेत्री रसिका सुनील करत आहे. या अगोदरच्या पर्वाचं सूत्रसंचालन स्पृहा जोशीने केलं होतं. दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत स्पृहाने रसिकाच्या सूत्रसंचालनावर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- “परत दुसऱ्या एका मालिकेचे दार…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
नुकतंच स्पृहाने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ‘सूर नवा ध्यास नवा’मधील रसिकाच्या सूत्रसंचालनावर प्रतिक्रिया दिली आहे. स्पृहा म्हणाली, “एखाद्या गोष्टीत बदल झाला की सगळेच त्या जुन्या गोष्टीला मिस करू लागतात. पण, प्रत्येक नव्या गोष्टीला वेळ द्यायला हवा. पहिल्याच झटक्यात कुणालाच काही सापडत नाही, हातात यायला प्रत्येकाला वेळ लागतो. माझी खात्री आहे की ती गोष्ट रसिकाच्या पटकन हातात येईल. रसिका उत्तम गायिका आहे. तिने गाणं शिकलं आहे. तिच्यासाठी सूत्रसंचालन फार अवघड नसेल, ती उत्तम काम करेल.”
स्पृहा पुढे म्हणाली, “रसिकाने मला फार सुंदर मेसेज केला आहे. मला या गोष्टीचं फार कौतुक वाटलं, याची काहीच गरज नव्हती. हा कामातला प्रोफेशनल भाग आहे. पण, तिने मला मेसेज केला आणि सांगितलं की, मी हे काम करत आहे. तू बघ आणि त्यात काही सुधारणा असतील तर मला नक्की सांग. हा मनाचा मोठेपणा आपल्या मराठी कलाकारांकडे आहे. त्यामुळे मला आपल्या मराठी कलाकारांचं कौतुक वाटतं.”
‘सूर नवा ध्यास नवा’ क्रार्यक्रमाचे रसिका सूत्रसंचालन करत असल्याने तिचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. मात्र, यंदा सूत्रसंचालन करताना स्पृहा दिसली नसल्यामुळे तिचे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. या अगोदरच्या पर्वातील स्पृहाच्या सूत्रसंचालनाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती, त्यामुळे अनेकांनी सूत्रसंचालनावरून स्पृहा आणि रसिकाची तुलनाही केली आहे.