‘उंच माझा झोका’, ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकांमुळे स्पृहा जोशी घराघरांत लोकप्रिय झाली. चित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयाप्रमाणेच स्पृहा तिच्या कवितांमुळे देखील चर्चेत असते. नुकतीच तिने आरपार युट्यूब चॅनेलच्या ‘वूमन की बात’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी स्पृहाने वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल स्पष्ट मत मांडत इंडस्ट्रीत तिला आलेले अनुभव सांगितले.
स्पृहाने लहान वयातच रंगभूमी व छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे करिअरमधील काही किस्से सांगताना ती म्हणाली, “सुरुवातीच्या काळात ऑडिशनमध्ये माझी प्रचंड चिडचिड व्हायची. माझ्या मनात यायचं, हा सहायक दिग्दर्शक मला काम येतंय की नाही? हे हा का सांगतोय? पण, मुद्दा काम येतंय की नाही हा नव्हताच. त्यावेळी माहितीच नसतं तू या लूकमध्ये कशी दिसतेस?, भूमिकेसाठी योग्य आहेस की नाही? या गोष्टी समजून घ्यायला मला वेळ लागला.”
स्पृहा पुढे म्हणाली, “पूर्वी मला ऑडिशन्सची खूप भीती वाटायची. आतापर्यंत ही गोष्ट मी फारशी कोणाला सांगितलेली नाही. सुरुवातीच्या काळात ऑडिशनला जायचं असेल तेव्हा मी घराबाहेर पडायचे. पुढे, काही वेळाने त्या संबंधित कास्टिंग दिग्दर्शकाला फोन करून आज वैयक्तिक कामामुळे मला ऑडिशनला येणं जमणार नाही असं मी सांगितलेलं आहे.”
हेही वाचा : “या वयात सुद्धा कमाल आवाज…”, प्रशांत दामलेंच्या गाण्याच्या व्हिडीओवर चाहतीची कमेंट, अभिनेते म्हणाले, “आताच…”
“मला यायला जमणार नाही असं मी दोन-तीन वेळा सांगितलं. त्यानंतर पराग मेहता नावाचा एक कास्टिंग दिग्दर्शक आहे. त्याने आजवर अनेक उत्तम प्रोजेक्टसाठी कास्टिंग केलंय. परागने मला फोन करून तू मला ऑफिसला भेटायला ये असं सांगितलं. ज्यावेळी मी त्याला भेटले तेव्हा तो मला म्हणाला, आज तुला जाणूनबुजून न सांगता मी ऑडिशनला बोलावून घेतलं. कारण, ऑडिशनला ये सांगितलं असतं, तर तू आली नसतीस आणि मी माझ्या सहकाऱ्याला देखील सांगून ठेवलं होतं की, ही आज नाही आली, तर यापुढे पुन्हा कधीच हिला फोन करायचा नाही. इंडस्ट्रीत खूप काम केल्यामुळे ऑडिशन देणार नाही असा माझा मुद्दाच नव्हता. मला खरंच खूप ऑडिशनची भीती वाटायची. यातून स्वत:ला बाहेर काढायला मला खूप वेळ लागला.” असं स्पृहाने सांगितलं.