स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. ती अनेकदा तिला वाटणाऱ्या गोष्टींबद्दल व्यक्त होत विविध विषयांवर तिची मतं मांडताना दिसते. तिचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं आहे. आपल्या मातृभाषेतून शिकल्यावर आपल्याला त्याचा कसा फायदा होतो हे तिने सांगितलं आहे.
तिने नुकतीच ‘व्हायफळ’ या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने लहानपणीपासून तिला मिळत गेलेली शिकवण, तिच्या आवडीनिवडी, विविध विषयांवरील तिची मतं शेअर केली. याचवेळी तिने मातृभाषेतून भाषेतून शिक्षण घेण्याबाबत तिचं मत व्यक्त केलं.
आणखी वाचा : “हे माझ्या घरच्यांनाही माहीत नाही….”, स्पृहा जोशीने उघड केलं तिच्याबद्दलचं एक मोठं गुपित
ती म्हणाली, “मला असं वाटतं की तुम्हाला दुसरे विषय कमी आले तरी चालतात पण तुमची भाषा जर चांगली असेल तर त्याचा खूप फायदा होतो. आपण मराठी माध्यमातून शिकलेली मुलं याबाबतीत भाग्यवान आहोत. माझा नवरा इंग्रजी माध्यमातून शिकला आहे. तो मला नेहमी असे म्हणतो की, ‘माझं कुठल्याच भाषेवर प्रभुत्व नाही. मला मराठीही तितकं चांगलं येत नाही आणि इंग्रजीही तितकं चांगलं येत नाही.’ हिंदी तर काय मुंबईमध्ये राहणाऱ्या कोणालाच चांगलं येत नाही. त्यामुळे ते सगळंच अर्धवट बोलतात.”
पुढे ती म्हणाली, “पण आपलं तसं नाहीये. मराठी ही आपली भाषा असल्यामुळे आपल्याला माहीत आहे की आपल्याला जे सांगायचंय ते आपण या भाषेतून नेमकं सांगू शकतो आणि मला असं वाटतं की त्याने तुमच्या व्यक्त होण्यामध्ये खूप फरक पडतो.” आता तिचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.