अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वानंदी आणि प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी स्वानंदीने ‘आमचं ठरलं’ असं म्हणत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. आता स्वानंदी पुन्हा एकदा चर्चत आली आहे. एका मुलाखतीत स्वानंदीने तिच्या आईबद्दल वक्तव्य केलं आहे.
स्वानंदी अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलगी आहे. मात्र, स्वानंदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राकडे वळली. आई-वडिलांबरोबर स्वानंदीचं नातं खूप घट्ट आहे. अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात स्वानंदीने तिच्या आईबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं होतं.
स्वानंदी म्हणालेली. “मी ४५ दिवसांची असताना आई मला शोसाठी दिल्लीला सोडून गेली होती. ती एका रात्रीत विमानाने परत आली होती. जेव्हा जेव्हा आई कार्यक्रमांसाठी बाहेर पडते तेव्हा ती माझी आई नाही असं मला वाटतं. कारण तेव्हा ती गायिका आरती अंकलीकर टिकेकर असते. जेव्हा कार्यक्रम करुन ती घरी येते आणि तिच्या कपाळावरची मोठी टिकली काढून घरचे कपडे घातले तेव्हा ती माझी आई असते.”
हेही वाचा- लोकप्रिय कॉन्टेन्ट क्रिएटर अभि आहे ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा लेक, तर नियू आहे सून
दरम्यान स्वानंदीने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत मिनल हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर तिने ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई’ या मालिकांमध्येही झळकली होती. स्वानंदी ही उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच गायिका देखील आहे. ती सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या गाण्याच्या पर्वाची विजेती ठरली होती. तसेच तिने ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले आहे.