‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेची कथा, संवाद, सर्व कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अभिनेत्री स्वरांगी मराठेची एन्ट्री झाली होती. तिला ती भूमिका कशी मिळाली याचा खुलासा आता तिने केला आहे.

या मालिकेत तिने अनुष्काची भूमिका साकारली. अनुष्का ही आशुतोषची खास मैत्रीण असते. अरुंधती आणि आशुतोषला जवळ आणण्यात अनुष्काने खूप मोठी भूमिका बजावली. तिची या मालिकेत जेव्हा एंट्री झाली तेव्हा ते पात्र थोडं नकारात्मक होतं. पण जसजशी मालिका पुढे सरकत गेली तसतशी तिची भूमिका सकारात्मक होत गेली.

आणखी वाचा : “माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार म्हणून…,” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्टने वेधलं लक्ष

सुलेखा तळवलकर हिच्या यूट्यूब चॅनलच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात स्वरांगीने नुकतीच हजेरी लावली होती. तेव्हा ती या मालिकेतील तिच्या भूमिकेबद्दल भरभरून बोलली. ती म्हणाली, “मला मुलगी झाली त्यानंतर मी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत भूमिका साकारली होती. तर आता मला मुलगा झाला आणि लगेच चार महिन्यांनी मला ‘आई कुठे काय करते’साठी फोन आला. योगायोगाने ती मालिका मी आधीपासून बघत होते. त्यात अनुष्का ही गाणारी दाखवली असल्याने मला गायचंही होतं. त्यामुळे नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. त्यातून ठाण्यात शूटिंग होतं हे एक मुख्य कारण ठरलं.”

हेही वाचा : Video: ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्याचा जोडीदार, नात्यावर शिक्कामोर्तब करीत म्हणाली…

पुढे ती म्हणाली, “मला वाटतं गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा बाहेर पडून स्वतःला पुश करून काहीतरी करायचं त्यात वेगळाच आत्मविश्वास वाटतो. तेव्हा आम्ही सगळे आहोत, तू काम कर असं मला घरच्यांनीही सांगितलं. अनुष्काची भूमिका माझ्या स्वभावाच्या अगदी वेगळी होती. सुरुवातीला ती वाईट वाटली पण नंतर तिनेच अरुंधतीला पाठिंबा दिला. यासाठी मला गायची संधीही मिळाली. निलेश मोहरीर आणि आम्ही एक गाणं केलं जे लोकांना खूप आवडलं.”