बॉलीवूड तसेच टीव्हीवर काम करून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तनाज इराणी होय. तनाज तिच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. तनाजच्या आयुष्यात खूप चढ-उतार आले. या सगळ्यांवर मात करत ती काम करत राहिली. तनाज तीन मुलांची आई आहे. तनाजचं पहिलं लग्न आंतरधर्मीय होतं, मात्र हे लग्न फार काळ टिकलं नव्हतं.

तनाज इराणीने पहिलं लग्न १९९२ मध्ये फरीद कुरीमशी केलं होतं. फरीद नाटकांमध्ये काम करायचे. त्यावेळी अभिनेत्री फक्त २० वर्षांची होती तर फरीद ३८ वर्षांचे होते. दोघांच्या वयात १८ वर्षांचे अंतर होते. तनाज इराणी लग्नानंतर एका वर्षात आई झाली. तिचं नाव जियान आहे. तिची मुलगी आता ३१ वर्षांची आहे. ती तिचे वडील फरीद कुरीम यांच्याबरोबर राहते.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत तनाजने फरीदशी लग्न करण्यामागचं कारण सांगितलं होतं. “ते थिएटरमध्ये काम करायचे. ते ज्या पद्धतीने अभिनय करायचे. काम करायचे आणि गायचे ते पाहिल्यावर मला ते आवडू लागले. त्यानंतर आम्ही लग्न केलं,” असं तनाज म्हणाली होती.

पहिल्या घटस्फोटाबद्दल तनाज म्हणते…

“वयातील अंतरामुळे माझ्यात आणि फरीदमध्ये अडचणी येऊ लागल्या. त्यावेळी मला फार काही समजत नव्हतं. मला फक्त काम करायचं होतं. अभिनेत्री व्हायचं होतं. जीवन जगायचं होतं. पार्टी करायची होती. पण तो वयाने खूप मोठा होता. तो स्थिरावला होता. त्याचे कुटुंब खूप चांगले आहे आणि तो खूप चांगला माणूस आहे. फक्त आमची वेळ चुकली. तो चुकीचा माणूस नव्हता, आमचं नातं ८ वर्षांनी संपलं,” असं तनाज म्हणाली होती.

तनाजने मुस्लीम असलेल्या फरीद कुरीमशी लग्न केल्याने पारसी समाजाने तिला नाकारलं. या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटलं, पण इस्लामने आपल्याला स्वीकारलं याचा आनंद झाला असं तनाज म्हणाली होती. तिला तिच्या मुलीला पारसी पद्धतीने वाढवायचं होतं पण ते शक्य झालं नाही, असंही तिने सांगितलं होतं.

२००६ मध्ये ‘फेम गुरुकूल’च्या सेटवर तनाजची भेट बख्तियार इराणीशी झाली आणि दोघे प्रेमात पडले. “आम्ही आमच्या नात्याबद्दल गंभीर होतो आणि लग्नाचा विचार करत होतो. मला माहीत होतं की तो माझ्यापेक्षा ७ वर्षांनी लहान आहे, मी घटस्फोटित होते आणि माझी १३ वर्षांची मुलगी होती. पण याचा अर्थ असा नाही की मी पुन्हा आनंदाने आयुष्य जगू शकत नाही. मलाही आनंदी राहायचा अधिकार आहे,” असं तनाज बख्तियारशी लग्न करण्याबद्दल म्हणाली होती.

तनाज व बख्तियार यांनी २००७ मध्ये लग्न केलं. त्यांना दोन अपत्ये आहेत. त्यांच्या लग्नाला १८ वर्षे झाली असून ते खूप आनंदी आहेत.