‘बिग बॉस मराठी’चं चौथ्या पर्वाची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिग बॉसचे यंदाचे पर्व सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात विजेतेपदाची दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस्विनी लोणारीला घराबाहेर पडावे लागले आहे. तिच्या हाताला झालेल्या दुखापतीनंतर हा निर्णय बिग बॉसकडून घेतला गेला. त्यामुळे तिचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला. मात्र नुकतचं पोस्ट शेअर करत तिला आलेल्या अनुभवाचे कथन केले आहे.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली तेजस्विनी ही सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. काही तासांपूर्वी तेजस्विनी लोणारीने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिला काय अनुभव आला याबद्दल सांगितले आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
तेजस्विनी लोणारीची पोस्ट
“नमस्कार कसे आहात सगळे…?
हा प्रश्न मी करायच्या आधीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कशी आहे..?
खरं सांगू, तुमच्या प्रेमामळे मी एकदम मस्त आहे. हा आता फ्रॅक्चरमुळे थोडा हात दुखतो आहे. पण तुमच्या प्रेमामुळे त्या वेदना सहन करण्याचीही ताकद मिळाली आहे. खरंतर तुमच्याशी बोलताना शब्दच सापडत नाहीये. असं म्हणतात की आपल्यावर आईपेक्षा जास्त निर्वाज्य प्रेम करणारे जगात कोणीच नसते. पण असं म्हणणाऱ्याला कसं सांगू की आईपेक्षाही जास्त प्रेम माझ्यावर महाराष्ट्रातील बिग बॉसची जनता करत आहे. मला माहिती आहे की बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणे माझ्यासाठी जेवढे कठीण होते तेवढेच ते तुमच्यासाठी सुद्धा होते.मी तुमच्या प्रेमाच्या ताकदीवर खेळ पुढे खेळण्याचा निर्णय घेतला होता. सज्जही झाले होते, परंतु बिग बॉसचया निर्णयापुढे कसे जाणार…? त्यांनी माझ्या हितासाठी जो आदेश दिला तो तर मान्य करावाच लागणार ना…पण त्या घरातून बाहेर पडताना अनुभवलं की माझ्यावर प्रेम करणारी माणसे किती आहेत.. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर ज्या गाडीतून घराकडे निघाले ते ड्रायव्हर दादा कंठ दाटून तुम्ही फिनालेमध्ये कसे हवे होतात हे वारंवार सांगत होते. ज्या हॉटेलमध्ये मी एक रात्र राहिले त्या हॉटेलचे कर्मचारीच मला त्या हॉटेलमध्ये पाहिल्या पाहिल्या रडायला लागले. आजतर शनिवार नाही मग तुम्ही कशा बाहेर आलात..?
तुम्ही बिग बॉस ना सांगून थांबायचं ना घरातच… असे अेक प्रश्न मला येत होते आणि मला त्यावर काहीही उत्तरेच देता येत नव्हती. मी माझ्यासाठी तळमळीने बोलणारी माणसे घरातून बाहेर पडल्यावर काही मिनिटातच अनुभवत होते. दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरकडे गेले तेव्हाही तोच अनुभव आला. हॉस्पिटलमध्ये सुद्धा स्टाफच नाही तर तिथे आलेले पेशंटसुद्धा तुमचा हात बरा आहे का…? तुम्ही परत बिग बॉसमध्ये जाणार आहात ना…? असे अनेक प्रश्न करु लागले.
या सगळ्यात एक आजोबा होते, त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. ते म्हणाले की मी कालच देवाला म्हणालो की बाबा रे मला अजून चार आठवडे जास्त लागले बरे व्हायला तर लागू दे. पण तेजाला पहिली बरं कर… माझ्यासाठी हे खरेच स्वप्नात घडतंय असेच वाटत होते. कारण तुम्हा प्रेक्षकांचे जे प्रेम मी आता अनुभवत आहे ते कल्पनेत सुद्धा मला मिळेल असे वाटले नव्हते.
डॉक्टरांनी जेव्हा दुखापत पाहिली तेव्हा प्रथमदर्शनी त्यांनी सांगितले की ही साधी दुखापत नाही. अशा पद्धतीची दुखापत ही शक्यतो कुस्ती, MMA किंवा अशा धरपकड करणाऱ्या खेळात होते. यामुळेच या खेळाच्या ट्रेनिंगवेळीच खेळाडूंना अशी इजा समोरच्याला होणार नाही, याची काळजी घ्या असे सांगितलेले असते. माझ्या बाबतीत मला थोडी सावधगिरी बाळगायला हवी होती असे आता वाटते आहे. पण खेळ आहे कधी काय कसे होईल काहीच सांगू शकत नाही.
घरी गेल्यावर मला वाटले की घरात आा जास्तच काळजीचे वातावरण असेल पण झाले उलटेच! एरव्ही मला जरा खरचटले तरी माझ्या आई वडीलांचा जीव वर खाली होतो, पण यावेळी ते कमालीचे शांत होते. त्यांनाही जाणीव झाले असेलच की आपल्या पेक्षाही जास्त प्रेम करणारी माणसे आज तेजुसोबत आहेत.
तुमचे आभार मी कधीच मानणार नाही. कारण तुमच्या प्रेमाची उतराई नाही करायची मला… आभार मानायचे तर बिग बॉसचे मानेन ज्यांच्यामुळे मला माझी माणसं मिळाली.. तुमच्या या प्रेमाच्या ताकदीवर लवकर बरे तर होणारच आहे मी, पण अधिक मेहनतीने तुमच्या मनोरंजनासाठी सुद्धा सज्ज व्हायचं आहे. शेवटी एकच सांगेन… हाथ टूटा है.. हौसला नहीं…लवकरच भेटू.. लव्ह यू ऑल”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान तेजस्विनीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसमधील टास्कदरम्यान तिला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला खेळातून बाहेर पडायचं की ‘बिग बॉस’च्या घरात राहायचं, हा निर्णय तेजस्विनीला घेण्यास बिग बॉसने सांगितला होता. त्यावेळी तेजस्विनीने घरात राहून खेळ खेळण्यासाठी बिग बॉसला विनंती केली होती. परंतु, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं बिग बॉसने सांगितलं होतं. यानंतर डॉक्टरांशी सल्ला घेतल्यानंतर तिची हाताची जखम गंभीर असल्याचे समोर आले. त्यानंतर तिला घराबाहेर पडावे लागले.