बिग बॉसच्या चौथ्या पर्वामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही सातत्याने चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या विजेतेपदाची दावेदार म्हणून तिला ओळखले जाते. मात्र तिच्या हाताला दुखापत झाल्याने तिला घराबाहेर पडावे लागले. त्यामुळे तिचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला. त्यानंतर आता तेजस्विनीने श्री तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आहे. याचा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे.
तेजस्विनी लोणारी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. बिग बॉसच्या घरातून आल्यानतंर ती सातत्याने विविध पोस्ट करताना दिसली. त्यातच आता तेजस्विनीने श्री तिरुपती बालाजीच्या दर्शनाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती तिरुपती बालाजी मंदिराची एक झलक दाखवताना दिसत आहे. त्याबरोबरच तिने या मंदिराबाहेर काढलेले काही फोटोही त्या व्हिडीओत पोस्ट केले आहेत. याला तिने एक कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “ज्या हॉटेलमध्ये मी एक रात्र राहिले त्याचे कर्मचारीच…” तेजस्विनी लोणारीने सांगितला ‘तो’ अनुभव
“नुकतीच श्री तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. तिथे जाऊन खूप छान वाटलं. प्रत्यक्षात बालाजीचे अखंड रूप पाहताना, अंगावर शहारा आला. या देवस्थानाची एक वेगळीच ऊर्जा आहे.
नवीन वर्षाची उर्जात्मक आणि सकारात्मक सुरुवात करण्यासाठी एका विलक्षण अनुभूतीचा आनंद मी घेतला. माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या प्रेक्षकांसोबत मला हा अनुभव शेअर करायचा होता. तुम्ही माझे कुटुंब असून तुमच्या सर्वांच्या वतीने मी बालाजीचे दर्शन घेतले आहे. माझ्यासोबत तुम्हा सर्वांचेही नवीन वर्ष चांगले जावो अशी मी प्रार्थना केली आहे. आपण असेच एकत्र आणि वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू. गोविंदा रे गोविंदा”, असे तेजस्विनी लोणारीने म्हटले आहे.
दरम्यान तेजस्विनीला बिग बॉसमधील टास्कदरम्यान गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला खेळातून बाहेर पडायचं की ‘बिग बॉस’च्या घरात राहायचं, हा निर्णय तेजस्विनीला घेण्यास बिग बॉसने सांगितला होता. त्यावेळी तेजस्विनीने घरात राहून खेळ खेळण्यासाठी बिग बॉसला विनंती केली होती. परंतु, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं बिग बॉसने सांगितलं होतं. यानंतर डॉक्टरांशी सल्ला घेतल्यानंतर तिची हाताची जखम गंभीर असल्याचे समोर आले. त्यानंतर तिला घराबाहेर पडावे लागले.