गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मराठी अभिनेत्री मनोरंजन सृष्टीतून एग्झिट घेऊन परदेशात स्थायिक झाले आहेत. कोणी एके काळी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री आज मनोरंजन सृष्टीपासून दूर आहेत. काही दिवसांपूर्वीच यात आणखी एक नाव सामील झालं ते म्हणजे उमा पेंढारकर. आता तिने मनोरंजनसृष्टी कायमची सोडली आहे का, याचा खुलासा केला आहे.
‘स्वामिनी’, ‘अग्गंबाई सूनबाई’, ‘योग योगेश्वर जयशंकर’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री उमा पेंढारकर ही मनोरंजन विश्वापासून दूर जाऊन न्यूझीलंडला राहायला गेली आहे. तिचा नवरा तिथे स्थायिक असतो. तर आता ती तिच्या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. तर आता नुकतंच एका चाहत्याच्या कमेंटला उत्तर देताना तिने मनोरंजनसृष्टीला कायमचा अलविदा केला आहे का? हे स्पष्ट केलं.
आणखी वाचा : “पायाजवळ घोणस आली आणि…”; उमा पेंढारकरने सांगितला शूटिंगदरम्यानचा चित्तथरारक अनुभव
उमाने तिच्या यू ट्यूब चॅनलवर नुकताच एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओतून तिने आयुष्याच्या कठीण काळात ती कोणत्या गोष्टी शिकली ते चाहत्यांची शेअर केलं. या व्हिडीओवर कमेंट करत एका चाहत्याने तिला विचारलं, “तुम्ही फिल्म इंडस्ट्री सोडली आहे का? आता तुम्ही कधीच ॲक्टिंग करणार नाही का?” चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत तिने लिहिलं, “हाहाहा असं काही नाही. पुढे बघू. आता तरी यूट्युब चॅनेलवरून भेटणार आहे तुम्हा सगळ्यांना.”
दरम्यान, उमा सोशल मीडियावर सक्रिय राहून न्यूझीलंडमधील निसर्ग सौंदर्य आणि ती तिथे काय काय करते याची झलक दाखवत असते. त्यामुळे आता तिच्या या उत्तराने ती भारतात परत कधी येणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.