विशाखा सुभेदार या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय विनोदी अभिनेत्रींपैकी एक आहेत. आतापर्यंत त्या ‘फु बाई फु’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा अनेक कार्यक्रमांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यांच्या उत्स्फूर्त आणि सहज सुंदर कामाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. गेली काही वर्षं त्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये दिसत होत्या. परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांनी हा कार्यक्रम सोडला. तर त्यांनी हा कार्यक्रम का सोडला आणि या कार्यक्रमामध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव कसा होता हे सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने विशाखा सुभेदार यांना वेगळी ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमामुळे त्यांचा चाहतावर्गही खूप वाढला. त्यांच्या सगळ्या स्किटना प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत होते. पण अशातच काही महिन्यांपूर्वी त्यांनी या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्या या कार्यक्रमातून बाहेर पडताच त्यांच्या या निर्णयाची खूप चर्चा रंगली. पण आता एका मुलाखतीमध्ये त्यांनी या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचं कारण सांगितलं आहे.

आणखी वाचा : “मोदकाच्या पाकळ्या करताना…”, विशाखा सुभेदार यांनी दिली मोदक उत्तम होण्यासाठी खास टीप, म्हणाल्या, “त्याचं सारण…”

त्या म्हणाल्या, “प्रेक्षकांचं माझ्यावर जितकं प्रेम आहे, जितक्या हक्काने ते मला माझं काम आवडलं हे सांगतात तितक्याच हक्काने तू हा कार्यक्रम का सोडलास? आम्हाला हा तुझा हा निर्णय आवडला नाही हे म्हणण्याचाही त्यांना हक्क आहे. आम्हाला जसं त्यांचं प्रेम हवं असतं तसं त्यांचा हा लटका रागही आम्ही स्वीकारला पाहिजे. पण दरवेळी मला जेव्हा हा प्रश्न येतो तेव्हा मी त्याचा उत्तर देते. मला कंटाळ आला होता. मी तेरा वर्षं स्किट फॉरमॅट करत आले आहे. त्यामुळे मला स्वतःला काहीतरी वेगळं करायचं होतं. स्किट झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या जजमेंटचा की आज चांगलं झालं, आज तू आणखीन चांगलं करू शकली असतीस… मला दरवेळी स्वतःला परीक्षेत उतरवायचा कंटाळ आला होता. आपलं काम आपल्याला छान वाटलं पाहिजे. माझ्या कामाचं परीक्षण दुसऱ्यांनी केल्यामुळे मला माझ्या कामाच्या समाधानाची पुडी बांधता येत नव्हती. मी माझा एव्हरेस्ट चढले आहे आणि मी खूप खुश आहे की माझ्या एव्हरेस्टवर मी झेंडा रोवला आहे. त्यामुळे मी आधी जिथे होते तिथे मी खुश होते आणि आता जिथे आहे तिथेही खूप खुश आहे.”

हेही वाचा : “नवीन मालिका खूपच वाईट आणि…” नेटकऱ्याच्या स्पष्ट प्रतिक्रियेवर विशाखा सुभेदारने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाली…

पुढे त्या म्हणाल्या, “मी हास्यचत्रा सोडण्याचं तेच मुख्य कारण होतं. त्यात कोणी माझा अपमान करत आहे, मला योग्य वागणूक देत नाहीये अशातला काहीही भाग नाही. हास्यजत्रेत माझे खूप लाड झाले, मला फटकारलंही गेलं, मला टोमणेही खावे लागले; जे प्रत्येक कलाकाराला खावे लागतात. जर कलाकाराचं काम चांगलं झालं नाही तर त्याला बोलणी खावी लागतात आणि जर चांगलं झालं तर त्याची वाहवाही ते करतात. त्या प्रत्येकाचे आम्ही भुकेले असतो. जर मी उद्या एखादं वाईट काम करत असेन आणि मला जर लोकांनी ते सांगितलं नाही तर याचा अर्थ लोक माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि कलाकाराला दुर्लक्षित केलं जाणं हे त्याच्यासाठी खूप वाईट असतं. मी खुश आहे की माझी अशी परिस्थिती नाही. मी हास्यजत्रा म्हणूनच सोडलं कारण मी कुठे आहे हे मला तपासून पाहायचं होतं.” आता विशाखा सुभेदार यांचे हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress vishakha subhedar revealed the main reason of quit acting in maharashtrachi hasyajatra rnv
Show comments