‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना चांगलेच आवडत आहेत. तर आता गृहप्रवेशानंतर अधिपतीने अक्षरासाठी खास उखाणा घेतला आहे ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
या मालिकेत अक्षरा ही भूमिका शिवानी रांगोळे साकारत आहे तर अधिपतीच्या भूमिकेत ऋषिकेश शेलार दिसत आहे. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह सोहळा संपन्न झाला. तर हा विवाह सोहळा झाल्यावर अक्षराचा पारंपरिक पद्धतीने गृहप्रवेश झाला. त्यावेळी अधिपतीने अक्षरासाठी खास उखाणा घेतला, तर विशेष म्हणजे त्यात भुवनेश्वरीचंही नाव आलं.
या मालिकेचा एक व्हिडीओ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला. त्यात अक्षराचा गृहप्रवेश झाल्यानंतरचा सीन दिसत आहे. यावेळी अधिपतीने अक्षरासाठी उखाणा घेतला. तो म्हणाला, “आईसाहेबांसारखी आई अख्ख्या पृथ्वीतलावर नाही, मास्तरीण बाईंचं नाव घेतो, त्यांचा तर नादच नाही.”
अधिपतीचा उखाणा आता सर्वांना आवडला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत त्याचा हा अंदाज आवडल्याचं नेटकरी सांगत आहेत.