‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेत सध्या एका नवीन पात्राची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. समीर निकम ऊर्फ पिंट्या असे या नवीन पात्राचे नाव आहे. सूर्याच्या बहिणीसाठी तेजूसाठी डॅडी एक स्थळ घेऊन येतात. ते समीर निकमचे आहे. हे पात्र साकारत असलेला अधोक्षज कऱ्हाडेने ही भूमिका कशी मिळाली, याबद्दल खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधोक्षज कऱ्हाडे मालिकेतील त्याच्या भूमिकेविषयी काय म्हणाला?

‘मराठी सीरियल्स’ या इन्स्टाग्राम चॅनेलने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात अधोक्षज कऱ्हाडेने त्याला ही भूमिका कशी मिळाली ते सांगितलं आहे. अधोक्षज कऱ्हाडेने म्हटले की, लाखात एक आमचा दादा’ मालिकेत माझ्या भूमिकेचं नाव समीर निकम ऊर्फ पंटर पिंट्या आहे. नावाप्रमाणे तो अगदीच पंटर आहे. लहानपणापासूनच तो चोरी, पाकीटमारी किंवा कागदपत्रं गायब करणे असे छोटे गुन्हे करत आला आहे. त्यासाठी त्याला अनेकदा जेलमध्येही राहावं लागलं आहे. पण, तो सराईत गुंडांसारखा क्रूर, दुष्ट नाही. तो मनानं अगदी साधा भोळा, प्रामाणिक आहे; पण परिस्थितीमुळे त्याला हा मार्ग स्वीकारावा लागला. जालिंदर निंबाळकर ऊर्फ डॅडी यांनी एका विशेष कामगिरीसाठी पिंट्याची जेलमधून सुटका केली आहे. शत्रूला तेजश्रीशी लग्न करायचे आहे; पण तेजश्रीला हे मान्य नाही म्हणून जालिंदरनं पिंट्याला म्हणजेच समीर नाईकला उभं केलं आहे. समीरचं लग्न तेजूशी ठरवलं जातं.

“हे पात्र नकारात्मक किंवा सकारात्मक आहे, असं म्हणता येणार नाही. कारण- या भूमिकेच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत. या मालिकेत निवड होण्यासाठी झी मराठीची आणखीन एक मालिका कारणीभूत आहे, असं मी म्हणेन. ३-४ वर्षांपूर्वी मी ‘घेतला वसा टाकू नको’ नावाची मालिका करीत होतो. त्या मालिकेचा क्रिएटिव्ह डायरेक्टर, जो या मालिकेवरही काम करत आहे, त्यानं माझं काम पाहिलं होतं. त्यानं माझं नाव सुचवलं.”

“त्या दिवशी मी सासुरवाडीला कोल्हापूरला निघत होतो. तेव्हाच मला कॉल आला की, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेमध्ये एक नवीन भूमिका आहे. तुला करायला आवडेल का? मी लगेच होकार दिला. महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन करून बाहेर येताच माझी निवड झाल्याचा कॉल आला. आज रात्रीच तुला साताऱ्याला पोहोचायचं आहे, असं सांगितलं गेलं. मी रात्रीच प्रवास करून पोहोचलो आणि त्याच रात्री माझी लूक टेस्ट झाली आणि दुसऱ्या दिवसापासून माझं शूटही सुरू झालं.”

“प्रेक्षकांकडून आणि मित्र परिवाराकडून खूप छान प्रतिसाद मिळत आहे. संकर्षणने माझ्यासाठी खूप छान पोस्ट टाकली होती, ज्यामुळे मी ही भूमिका करीत आहे, हे अधिक लोकांपर्यंत पोहोचलं. जो प्रतिसाद मिळत आहे, तो उत्तम आहे. लोक आपल्या कामाची स्तुती करत आहेत हे बघून बरं वाटतंय आणि आता माझी जबाबदारी आहे की, मी अजून छान काम करत राहावं. माझं सर्वांशी खूप छान बॉण्डिंग होत आहे. बरेच कलाकार माझ्या ओळखीचे आहेत.”

हेही वाचा: “आजच्याइतकी हतबुद्धता कधीही…”, अभिनेते अतुल कुलकर्णींची राजकीय स्थितीवर टोकदार भाष्य करणारी कविता!

मालिकेत सध्या तेजूच्या लग्नाची तयारी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तेजू आणि समीरच्या लग्नाची सुपारी फुटल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, डॅडींना त्याच्या मुलाचे शत्रूचे लग्न तेजूबरोबर लावायचे आहे. आता डॅडींचा हा प्लॅन यशस्वी होणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adhokshaj karhade on his role in lakaht ek aamcha dada marathi serial as sameer also on equation with co stars nsp