अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दोन वर्षांपूर्वी तिने आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या संसारात बरेच वाद निर्माण झाले आणि आदिल वर अनेक आरोप लावत राखीने त्याला तुरुंगात पाठवलं. नुकतीच आदिलची तुरुंगातून सुटका झाली असून आता तो बाहेर आल्यावर त्याने राखीवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.
आदिलशी लग्न केल्यानंतर राखीने तिचं लग्न झालं असल्याचं लपवून ठेवलं. लग्न झाल्यावर सहा महिन्यांनी त्यांचं लग्न आधीच झालं असल्याचं दाखवणारे फोटो आणि त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट समोर आलं. परंतु त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक वादळ निर्माण झाली. आदिल खानने माझी फसवणूक केली, तो मला मारहाण करायचा, लग्नानंतर तो एका वेगळ्याच मुलीला डेट करत होता असे आरोप राखीने आदिलवर केले. त्यानंतर त्याला म्हैसूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता त्याची सुटका झाली असून त्याने त्याची बाजू सर्वांसमोर मांडली आहे.
‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदिलने राखीच्या आईबरोबर त्याचं कसं नातं होतं हे सांगितलं. तर याचबरोबर राखी तिच्या आईचं निधन झाल्यावर बराच वेळ हॉस्पिटलमध्ये आली नाही असंही तो म्हणाला. आदिल म्हणाला, “राखी सावंतच्या आईचा माझ्यावर खूप जीव होता. त्यांना मी खूप आवडायचो. माझंही त्यांच्यावर प्रेम होतं. राखी बिग बॉस मराठीमध्ये असताना मी दर आठवड्याला राखीच्या आईला भेटायला जायचो. मी त्यांच्याबरोबर ख्रिसमसही सेलिब्रेट केला होता. माझ्या आईला कॅन्सर झाला आहे असं सांगून तिने अनेक जणांकडून पैसे लुबाडले. पण ज्या दिवशी त्यांचं निधन झालं तेव्हा राखी बराच वेळ तिच्या आईचं पार्थिव बघायलाही हॉस्पिटलमध्ये आली नाही.”
हेही वाचा : वयाच्या ४४ व्या वर्षी राखी सावंत गरोदर? प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली…
पुढे तो म्हणाला, “दुपारी तीनच्या सुमारास त्यांचं निधन झालं. मला ही बातमी साडेतीन वाजता कळली आणि मी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. मी त्यानंतर अनेकदा राखीला फोन केले आणि तिला सांगितलं तुही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ये. पण ती संध्याकाळी सात-आठ वाजेपर्यंत आली नाही. याचं मुख्य कारण म्हणजे तिथे मीडियावाले आले नव्हते. त्या सुमारास पठाण प्रदर्शित होणार होता आणि त्याचा एक कार्यक्रम होता त्यामुळे सगळे मीडिया फोटोग्राफर त्या कार्यक्रमाला गेले होते. त्यानंतर काही काळाने मीडिया फोटोग्राफर तिथे आले मग राखी आली. मग ती त्यांच्यासमोर भरपूर रडली. पण तिचा रडणं नेहमी नाटकच असतं. त्यानंतर रात्री अकरा वाजता मी घरी आलो. मी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेलो जिथे राखी होती. तिथे आम्ही तिघे बसलो होतो. रात्री एक वाजता राखी बिर्याणी, चिकन चिली आणि प्रॉन्स कबाब खात होती. त्यावेळी मी एक घासही खाल्ला नाही, माझ्या डोळ्यात अश्रू होते. पण राखीला हे करताना पाहून ती किती खालच्या पातळीची आहे हे मला समजलं.” हे सगळं सांगत असताना आदिलने राखी सावंत रात्री जेवत असल्याचा व्हिडिओ ही दाखवला आहे. त्यामुळे आता आदिलचं बोलणं खूप चर्चेत आलं आहे.