Zee Chitra Gaurav : मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा नुकताच पडला. या सोहळ्यात दरवर्षी मराठी मनोरंजन विश्वात उत्तम कामगिरी करणाऱ्या चित्रपटांचा तसेच कलाकारांचा सन्मान केला जातो. यावेळी पुरस्काराच्या शर्यतीत ‘नाच गं घुमा’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘पाणी’, ‘फुलवंती’ असे बरेच सिनेमे होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर कोणी मोहोर उमटवलीये जाणून घेऊयात…
‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात प्राजक्ता माळीची निर्मिती व प्रमुख भूमिका असलेल्या ‘फुलवंती’ला ६ पारितोषिकं मिळाली. तर, अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे याच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शित ‘पाणी’ चित्रपटाने ‘झी चित्र गौरव’ पुरस्कारात तब्बल सात पुरस्कार जिंकले आहेत.
आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ हा यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट देखील ठरला आहे. नागदरवाडी गावातील हनुमंत केंद्रे आणि सुवर्णा केंद्रे यांच्या आयुष्यावर आधारित ‘पाणी’ ( Paani ) हा चित्रपट आहे.
मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’च्या आयुष्यावर प्रेरित होऊन सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा होता. ‘पाणी’ चित्रपट ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात अव्वल ठरला आहे. ‘पाणी’ची गोष्ट ही खास ठरली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली. ‘पाणी’ सिनेमाने अनेक फिल्म फेस्टिव्हल्समध्ये देखील कौतुकाची थाप मिळवली आहे.
‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात ‘पाणी’ने सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन ( अनमोल भावे ), सर्वोत्कृष्ट पटकथा ( नितीन दीक्षित ), सर्वोत्कृष्ट गीतकार -आदिनाथ कोठारे आणि मनोज यादव , सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक ( गुलराज सिंग ), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ( आदिनाथ कोठारे ) सर्वोत्कृष्ट चित्रपट ( पाणी ) असे तब्बल ७ पुरस्कार पटकावले आहेत.
मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आदिनाथ कोठारे कायम प्रयोगशील भूमिका आणि तितकंच खास दिग्दर्शन करताना दिसतो. आता येणाऱ्या काळात आदिनाथ अजून एका नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.