मराठी कलाविश्वातील अनेक कलाकरांनी बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, सई ताम्हणकर, महेश मांजरेकर, श्रिया पिळगावकर अशा बऱ्याच कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता या यादीत मालिका विश्वातील आणखी एका कलाकाराचा समावेश होणार आहे. पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सीरिजमध्ये ‘काव्यांजली’ फेम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.
‘इंडियन पोलीस फोर्स’ या बहुचर्चित सीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टी आणि सुशवंत प्रकाश दिग्दर्शित या सीरिजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या सीरिजमधील महत्त्वाच्या भूमिकेसाठी मराठी अभिनेत्याची वर्णी लागली आहे.
‘बिग बॉस मराठी’, ‘काव्यांजली’ मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला छोट्या पडद्यावरील अभिनेता आदिश वैद्य लवकरच ‘इंडियन पुलिस फोर्स’ या बॉलीवूड सीरिजमध्ये झळकणार आहे. नुकताच त्याने या चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आदिशबरोबर बॉलीवूडचा शेरशाह अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : “मी आयुष्यात पुन्हा कधीच अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही,” शेफाली शाहने भर मंचावर दिलं वचन
आदिशने या फोटोला “बॉलीवूडच्या या स्टारबॉयबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने मी खरंच खूप आनंदी आहे. एका महत्त्वाच्या सीननंतर आम्ही हा फोटो काढला आहे.” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच कॅप्शनच्या खालोखाल आदिशने ‘इंडियन पोलीस फोर्स’ या हॅशटॅगचा वापर केला आहे. यापूर्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीबरोबर फोटो शेअर करून आदिशने या नव्या प्रोजेक्टची बातमी त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
हेही वाचा : अमित भानुशालीच्या लेकाचं ‘ठरलं तर मग’ मालिकेत पदार्पण, ‘या’ सीनमध्ये दिसली हृदानची झलक
दरम्यान, ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही बहुप्रतीक्षित सीरिज १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिका साकारणार असून या सीरिजच्या पहिल्या सीझनचे एकूण सात भाग एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.