‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. येत्या डिसेंबर महिन्यात अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या भागाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच प्रेक्षकांच्या मनात ‘पुष्पा २’बद्दल मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘पुष्पा २’ चित्रपटातील गाणं मे महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित करण्यात आलं. “अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामी…” असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आलं आहे. हे गाणं लॉन्च झाल्यावर लगेच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं. मोठमोठ्या कलाकारांपासून ते इनफ्लुएन्सर्सपर्यंत सगळेजण ‘पुष्पा २’च्या गाण्यावर ठेका धरत आहेत. मराठी मनोरंजनविश्वातील बऱ्याच कलाकारांनी या गाण्यावर डान्स केल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं.
ऐश्वर्या व अविनाश नारकर, अक्षरा – अधिपती, स्पृहा जोशी, ऋषिकेश – जानकी, ‘पारू’ मालिकेतील कलाकार अशा सगळ्या कलाकारांनी ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स केले आहेत. अशातच ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री अदिती द्रविडने या गाण्यावर एक खास रील व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये अदितीने तिच्या आजीबरोबर मिळून ‘पुष्पा २’च्या गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे. अदितीच्या आजीने गाण्यातील हुकस्टेप अगदी हुबेहूब केल्या आहेत.
अदिती द्रविडच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या सुंदर अशा डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अदितीने या व्हिडीओला “माझी पुष्पा… फायर हैं फायर” असं कॅप्शन दिलं आहे. तर या कॅप्शनपुढे अदितीने #आजीबाई व #पुष्पा हे हॅशटॅग दिले आहेत.
दरम्यान, अदिती द्रविडबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीने काही आठवड्यांपूर्वी स्वत:चं हक्काचं घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये ती झळकली होती. या मालिकेचं कथानक लतिकावर आधारित होतं. यामध्ये लतिकाची भूमिका अभिनेत्री अक्षया नाईकने साकारली होती. तर, अभ्याची मैत्रीण नंदिनीच्या भूमिकेत अदिती झळकली होती. गेल्यावर्षी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
याशिवाय गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटासाठी अदितीने ‘मंगळागौर’ हे गाणं लिहिलं होतं आणि सध्या नुकतंच प्रदर्शित झालेलं तिचं ‘मन पाखरावानी’ हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे.