Paaru : ‘पारू’ मालिकेत सध्या आदित्य कंपनीवरच्या लोगोवरचे डोळे नेमके कोणाचे आहेत याचा शोध घेताना दिसतोय. लवकरच ती मुलगी दुसरी-तिसरी कोणीही नसून ‘पारू’ आहे हे सत्य आदित्यसमोर येणार आहे. कंपनीच्या लोगोवरचे डोळे आदित्य रोज पाहत असतो, खरंतर त्याच्याही नकळत तो त्या डोळ्यांच्या प्रेमातच पडलेला असतो. पण, ते डोळे ‘पारू’चे आहेत हे सत्य आदित्यला माहिती नसतं आणि पारूला सुद्धा याबद्दल आदित्यला काहीच कळू द्यायचं नसतं.

पारूचा चेहरा संपूर्णपणे लपवलेला असतो. तिचे डोळे फक्त सर्वांना दिसतात. इतक्यात आदित्य तिच्याजवळ येतो आणि तिला चेहरा दाखवण्याची विनंती करतो. मात्र, पारू त्याच्यासमोर हात जोडून नकार देते. पारू चालत असताना आदित्य तिच्या पायातील पैंजण पाहतो आणि ही मुलगी म्हणजे आपली पारूच आहे याची खात्री त्याला पटते. आदित्यचा आनंद गगनात मावेनासा होतो. आता लवकरच आदित्य आपल्या प्रेमाची कबुली पारूसमोर देईल असा सीक्वेन्स मालिकेत पाहायला मिळणार आहे.

पारूच्या डोळ्यांचं सत्य अखेर आदित्यसमोर येणार या बहुप्रतीक्षित प्रोमोची नेटकरी गेल्या वर्षभरापासून आतुरतेने वाट पाहत होते. यादरम्यान, मालिकेच्या कथानकात अनेक बदल झाले आणि आता शेवटी पारूच्या डोळ्यांचं सत्य आदित्यला समजणार आहे. पण, प्रत्यक्षात विचार केला तर, पारूचे डोळे आदित्य रोज पाहत असतो. त्यामुळे त्याच्यापासून एवढे महिने सत्य लपून राहणं हा ट्रॅक पाहून प्रेक्षकांनी या प्रोमोवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

“फायनली समजलं…माझ्या लहान मुलीला सुद्धा कधीच समजलं होतं… बरं झालं आदित्यला आता तरी समजलं”, “बापरे किती लवकर ओळखलंय”, “फालतूपणा चालू आहे”, “अरे किती उशीर करणार लवकर दाखवा”, “किती ताणतात हे लोक”, “मंद आदित्य बावळट पारू आणि महामूर्ख अदिल्यादेवी”, “मूर्खपणा आहे हा…लहान मुलांना पण डोळे ओळखता येतील”, “रोज पारूचे डोळे पाहूनही यांना समजलं नाहीये कमाल आहे बाबा”, “मला वाटतं आदित्यला स्पष्ट दिसत नाहीये म्हणून एवढ्या जवळ असूनही त्याला समजत नव्हतं” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.

paaru
पारू मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Paaru )

दरम्यान, ‘पारू’ मालिकेत आता लवकरच आदित्य आपल्या मनातील भावना पारूसमोर व्यक्त करेल असा सीक्वेन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रोज संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाते.