निर्माता करण जोहर त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामुळे आणि एकूणच बॉलिवूड गॉसिपमुळे बराच चर्चेत असतो. मध्यंतरी त्याने ट्वीटरला रामराम ठोकल्याने मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली होती. त्यानंतर लोकांनी करणवर टीकाही केली. ट्विटर बंद पण इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर करण सक्रिय असल्याने लोकांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. सध्या करण ‘झलक दिखला जा १०’ या डान्स रीयालिटि शोमध्ये परीक्षक म्हणून भूमिका बजावत आहे.
याच कार्यक्रमातील लवकरच प्रदर्शित होणाऱ्या एका एपिसोडचा टीझर ‘लर्स टीव्ही’च्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला. या एपिसोडमध्ये निशांत भट या स्पर्धकाने ‘अधुरी कहानी’ या गाण्यावर परफॉर्म केलं आणि यामधून त्याने ‘LGBTQIA+ Community’ च्या व्यथा मांडल्या. कशाप्रकारे समाज त्यांची खिल्ली उडवतो, कुटुंब कसं त्यांना वाळीत टाकतं अशा कित्येक गोष्टींवर त्याने या डान्सच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. त्याचा हा डान्स बघून सगळ्यांनाच गहिवरुन आलं.
आणखी वाचा : वरुण धवनच्या ‘भेडिया’चा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांना आठवला महेश भट्ट यांचा चित्रपट, म्हणाले “हा तर…”
निशांतने सादर केलेलं नृत्य बघून परीक्षक माधुरी दीक्षित आणि करण जोहर खूप भावूक झाले. माधुरी दीक्षितने नुकतीच ‘मजा मा’ चित्रपटात एका लेसबीयन आईची भूमिका साकारली आहे, त्यामुळे तिने याबद्दल वक्तव्य केलं आणि या कम्युनिटीला न मिळणाऱ्या सन्मानाबद्दल खेदही व्यक्त केला. करण जोहरला हे बघताना अश्रु अनावर झाले. निशांतचं कौतुक करताना करण म्हणाला, “तुझा डान्स पाहून मी सुन्न झालो होतो, कारण मी या सगळ्या गोष्टी सहन केल्या आहेत, मी स्वतः यातून गेलो आहे.”
निशांतने आपल्या डान्समधून या कम्यूनिटीमधल्या लोकांच्या समस्यांना वाचा फोडल्याने सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होताना दिसत आहे. प्रेक्षकांनीही या गोष्टीला चांगलाच पाठिंबा दर्शवला आहे. शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता कलर्स टेलिव्हिजन या चॅनलवर आणि वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.