छोट्या पडद्याच्या माध्यमातून आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचलेले अभिनेत्री गौतमी देशपांडे हिची चुहूबाजने चर्चा सुरू आहे. याचं कारण म्हणजे तिचं लग्न. २५ डिसेंबरला गौतमी कंटेंट क्रिएटर स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्नबंधनात अडकली. मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी, रिसेप्शन असा समारंभपूर्वक लग्नसोहळा गौतमी-स्वानंदचा झाला. सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच लग्नानंतर गौतमी-स्वानंद कोकणात फिरायला गेले आहेत. याचे देखील फोटो समोर आले आहेत.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. एका फोटोमुळे गौतमी-स्वानंदचं अफेअर असल्याची शंका आली होती. पण यावर दोघांनी मौन पाळलं. थेट २३ डिसेंबरला मेहंदी सोहळ्याचे फोटो पोस्ट करून गौतमी-स्वानंदने प्रेमाची कबुली दिली आणि अखेर शंका खरी ठरली. त्यानंतर दोघांचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पाहायला मिळाला. या लग्नाला अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर गौतमी-स्वानंद सध्या कोकणात फिरताना दिसत आहेत. दोघांचे फोटो ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने लोकप्रिय असणारी कोकण कन्या म्हणजे अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हेही वाचा – गौतमी देशपांडे आणि स्वानंदी टिकेकरनंतर ‘ही’ मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर
अंकिताने शेअर केलेल्या फोटोमधून गौतमी-स्वानंद देवबागला फिरायला गेल्याचं स्पष्ट झालं आहे. दोघं कोकणच्या समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसत आहे. अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर गौतमी-स्वानंदचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.
गौतमीचा नवरा कोण आहे?
गौतमीचा नवरा स्वानंद तेंडुलकर लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आहे. ‘भाडिपा’ या मराठी सीरिज व कंटेट बनवणाऱ्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलचा तो व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम पाहतो आहे. शिवाय त्याचा भाडिपाच्या वेब सीरिज आणि स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात सहभाग असतो. गौतमीप्रमाणे स्वानंद तेंडुलकरचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे.