Aishwarya & Avinash Narkar : मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. हे कलाकार नेहमीच एकमेकांना खंबीरपणे साथ देताना दिसतात. इंडस्ट्रीतील अशाच एका त्रिकुटाच्या मैत्रीला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने या कलाकारांनी एव्हरग्रीन गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळालं.
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. आजवर अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम करून त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयाव्यतिरिक्त ही जोडी त्यांच्या सोशल मीडिया रील्समुळे देखील चर्चेत असते. हे दोघंही नेहमीच विविध ट्रेडिंग गाण्यांवर भन्नाट डान्स करताना दिसतात. ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी नुकताच एका सदाबहार गाण्यावर डान्स केला आहे आणि यामध्ये त्यांना लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी कासारने साथ दिली आहे.
ऐश्वर्या व अविनाश नारकरांसह अभिनेत्री अश्विनी कासारने किशोर कुमार यांच्या लोकप्रिय ‘ईना मीना डीका’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. यामध्ये तिघांनी ‘ओपन शर्ट विथ टीशर्ट’ असा वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. जबरदस्त एनर्जीने हे तिघेही ‘ईना मीना डीका’ गाण्यावर थिरकले आहेत. या तिन्ही कलाकारांच्या केमेस्ट्रीने सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
ऐश्वर्या नारकरांनी या व्हिडीओला, “मैत्रीची १० वर्षे… आणि यामध्ये अशीच वाढ होत राहो” असं कॅप्शन दिलं आहे. यावरून या त्रिकुटाच्या मैत्रीला १० वर्षांहून अधिक काळ झाल्याचं स्पष्ट होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मस्त मलाही तुमच्याबरोबर रील व्हिडीओ करायचा आहे”, “मस्तच…”, “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”, “एक नंबर अवि दादा लव्ह यू”, “क्या बात हैं चिरतारुण्य लाभलेलं दांपत्य” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ऐश्वर्या यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर, अविनाश नारकर सध्या ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत जीवा आणि पार्थच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत.