Aishwarya Narkar : बऱ्याच कलाकार मंडळींची मुलं विदेशात शिक्षण घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसाद ओक, रवी जाधव यांची मुलं विदेशातील विद्यापीठातून पदवीधर झाल्याच पाहायला मिळालं. आता यामध्ये ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांच्या मुलाचं नाव देखील सामील झालं आहे. ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा मुलगा अमेय नारकर पुढील शिक्षणासाठी विदेशात निघाला आहे. याचा व्हिडीओ अविनाश नारकरांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला असून खास पोस्ट लिहिली आहे.
ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) व अविनाश नारकर यांचा मुलगा अमेय नारकरला लहानपणापासून अभिनय व नृत्याची आवड आहे. रुईया महाविद्यालयातून त्यानं बीएमएममधून (संज्ञापन आणि माध्यम विभाग) शिक्षण घेतलं आहे. यावेळी त्यानं बऱ्याच एकांकिका, नाटकात काम केलं होतं. गेल्यावर्षी त्यानं दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं. ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ या व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा अमेयनं सांभाळली होती. आता अमेय पुढील शिक्षणासाठी विदेशात निघाला आहे.
हेही वाचा – Video : Bigg Boss वहिनीचं तरी ऐका! घरात वाहू लागले प्रेमाचे वारे; निक्की तांबोळी अन् अरबाजची जोडी जमणार का?
अविनाश नारकरांची खास पोस्ट
अविनाश नारकरांनी आपला लाडका लेक पुढील शिक्षणासाठी विदेशात जात असल्यानिमित्ताने सुंदर फोटो शेअर केले असून पोस्ट लिहिली आहे. पहिल्या पोस्टमध्ये अविनाश यांनी अमेयबरोबरचा बालपणीचा फोटो आणि ऐश्वर्या नारकरांबरोबरचा फोटोचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, “आज आमचा मन्या…आमचा अमेय निघाला पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला…नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचं आणि शिकण्याचं तुझ्या डोळ्यातलं व मनातलं कुतूहल असंच कायम जागं राहू दे मन्या…कोणीही दुखावलं जाईल असं काही करू नकोस…कायम आनंदी राहा आणि तुझ्या कामातून सगळ्यांना आनंद दे…!! आमचे सगळ्यांचं भरभरून प्रेम आणि आभाळभर आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेतच बब्बु…!! यशस्वी भव…”
या पोस्टनंतर अविनाश यांनी मुंबई विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, “मन्या बाबू तुला खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा, सुरक्षित आणि यशस्वी प्रवास होवो.” अविनाश नारकरांच्या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी अमेयला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या नारकरांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसंच अविनाश यांचा ‘डंका हरी नामाचा’ चित्रपट अलीकडेच १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात अविनाश नारकरांसह अभिनेता अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, रसिका सुनिल, अक्षया गुरव झळकले आहेत. या चित्रपटातील गाणी सध्या चांगली चर्चेत आहेत.