ऐश्वर्या नारकर आणि माधवी निमकर या मराठी टेलिव्हिजन विश्वातील सध्याच्या घडीच्या लोकप्रिय खलनायिका म्हणून ओळखल्या जातात. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ‘रुपाली’ हे खलनायिकेचं पात्र साकारत आहेत. तसेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर ‘शालिनी’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका चालू असल्याने माधवीला आता घराघरांत शालिनी अशी ओळख मिळाली आहे. रुपाली आणि शालिनी या दोन्ही दमदार खलनायिका जेव्हा एकत्र होतं तेव्हा नेमकं काय घडतं? एकदा पाहाच…
ऐश्वर्या नारकर आणि माधवी निमकर नुकत्याच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र भेटल्या होत्या. यावेळी या दोघींनी मिळून ‘मोरनी’ या रॅपर रफ्तारच्या गाण्यावर डान्स केला. या दोघींना एकत्र थिरकताना पाहून नेटकरी भलतेच खूश झाले आहेत. दोन आघाडीच्या आणि त्यातही वेगवेगळ्या वाहिनीवरच्या खलनायिकांना एकत्र पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. त्यामुळे ऐश्वर्या आणि माधवी यांच्या डान्स व्हिडीओवर सध्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.
हेही वाचा : ठरलं तर मग : प्रिया चोरणार कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल, अर्जुन रंगेहाथ पकडणार? पाहा प्रोमो
ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओला “डिसेंट वाली मोरनी…माधवी आपण फायनली एकत्र रील व्हिडीओ केला” असं कॅप्शन दिलं आहे. यावेळी ऐश्वर्या नारकरांनी सुंदर अशी पिस्ता रंगाची साडी नेसली होती. तर, माधवी वेस्टर्न लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने गडद हिरव्या रंगाचा ड्रेस घालून त्यावर सुंदर असा नेकलेस परिधान केला होता.
ऐश्वर्या आणि माधवी या दोघींमध्ये आणखी एक साम्य आहे ते म्हणजे योगा. या दोघी दमदार खलनायिका आहेतच परंतु, चाहते त्यांच्या फिटनेसचं सर्वात जास्त कौतुक करत असतात. या दोघींचे सोशल मीडियावरचे योगा व्हिडीओ पाहून अनेक महिलांना प्रेरणा मिळते. त्यामुळे ऐश्वर्या आणि शालिनी यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
नेटकऱ्यांनी या दोघींच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अश्विनी कासारने यावर “माझ्या दोन आवडत्या अभिनेत्री एकाच फ्रेममध्ये” अशी कमेंट केली आहे. तर, इतर काही युजर्सनी “दोन सुंदर अभिनेत्री आणि योगा मास्टर्स एकाच फ्रेममध्ये”, “दोन गोंडस अभिनेत्री”, “विरोचक आणि शालिनी” अशा प्रतिक्रिया यांच्या डान्स व्हिडीओवर आल्या आहेत.