Aishwarya Narkar : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत विरोचकाचा वध करून सध्या नेत्रा आपल्या दोन्ही मुलींबरोबर आयुष्य जगत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, नेत्राच्या दोन्ही मुलींचे स्वभाव हे एकमेकींपेक्षा विरुद्ध असतात. या दोघींपैकी ईशा देवाशी निगडीत असलेल्या गोष्टी स्वीकारते पण, रीमा या गोष्टींपासून दूर जाते. देवांच्या संदर्भातील एकही गोष्ट ती स्वीकारत नाही. विरोचकाचा अंश नेत्रा गर्भवती असताना तिच्यात गेल्याने मालिका आता काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच कोलकाता येथे एक नवीन गोष्ट घडते.
कोलकाता येथे एका उत्खननात शतग्रीव नामक असूराचा शिलालेख सापडतो. या शिलालेखाचं वाचन करताच एक शक्ती जागी होते. डॉ. मैथिली सेनगुप्ता यांच्यात ही शक्ती प्रवेश करते. यामुळे सरळ साध्या स्वभावाची मैथिली शतग्रीव बनते. आपल्या सासूचा खून करून आणि “बंधुराज विरोचक मी येतोय” असं म्हणत ही शक्ती कोलकाता येथून महाराष्ट्राच्या दिशेने निघते. आता शतग्रीव महाराष्ट्रात आल्यावर नेत्राचं नशीब कसं पालटणार? मालिकेत नेमकं काय घडणार? या गोष्टींचा उलगडा लवकरच होणार आहे.
हेही वाचा : शिवाजी साटम यांना राज्य शासनाकडून व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर! दिग्पाल लांजेकर यांचाही होणार सन्मान
ऐश्वर्या नारकर यांचा जबरदस्त लूक
शतग्रीवच्या भूमिकेत मालिकेत ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) झळकणार आहे. नव्या रुपात त्यांनी जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. बंगाली लूक, तशीच भाषाशैली अन् गुलाल उधळत शतग्रीवच्या रुपात ऐश्वर्या नारकर दिसणार आहेत. त्यांचा लूक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मालिकेचा हा नवीन प्रोमो पाहून नेटकऱ्यांसह मराठी कलाकार सुद्धा थक्क झाले आहेत.
अश्विनी कासार, अनघा अतुल, ऋतुजा बागवे या कलाकारांनी कमेंट्स करत ऐश्वर्या नारकर यांचं कौतुक केलं आहे. तर नेटकऱ्यांनी “ऐश्वर्या ताई जसा विरोचक साकारलात तसाच किंबहुना त्यापेक्षा जास्त छान शतग्रीव साकाराल… खूप खूप शुभेच्छा…” अशा कमेंट्स अभिनेत्रीने (Aishwarya Narkar ) शेअर केलेल्या या नव्या प्रोमोवर केल्या आहेत.
हेही वाचा : “एखाद्या बाईच्या मातृत्त्वावर बोलताना…”, निक्कीच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे मराठी अभिनेत्याचा संताप! म्हणाला, “वर्षा ताई…”
दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दररोज रात्री १०.३० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. शतग्रीवचा नवीन अध्याय सुरू झाल्यावर मालिका कोणतं वळण घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.