Actress Aishwarya Narkar Dance Video : मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांना ओळखलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. विशेषत: टेलिव्हिजन मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या विशिष्ट भूमिका, मालिका संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. अभिनयाबरोबरच ऐश्वर्या नारकर त्यांच्या रील्स व्हिडीओमुळे सुद्धा चर्चेत असतात.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांनी स्वत:चा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. दररोज सकाळी योगा, आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. याशिवाय जेवणाचे विविध पदार्थ कसे बनवायचे, त्यांचं पाळीव प्राण्यांवर असलेलं प्रेम, फॅशन गोल्स ते प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे डान्स व्हिडीओ या सगळ्या गोष्टींची झलक अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळते.

ऐश्वर्या नारकरांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका डान्स व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या डान्स व्हिडीओमध्ये ऐश्वर्या यांना त्यांची जवळची मैत्रीण अश्विनी कासारने साथ दिली आहे. अभिनेत्रीने जीन्स आणि टॉप घालून खास वेस्टर्न लूकमध्ये या गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या व अश्विनी यांनी ट्विनिंग ( एकसारखा लूक ) केल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर रील्सवर “काँटा लगा हाय लगा…” या गाण्याची तुफान क्रेझ निर्माण झाली आहे. याच गाण्यावर ऐश्वर्या व अश्विनी घरच्या घरी थिरकल्या आहेत. दोघींनी एन्जॉय करत या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

‘काँटा लगा’ या गाण्यातील “भूल तो हो गई जो किया सो किया…” या कडव्यावर ऐश्वर्या नारकर थिरकल्या आहेत. यामुळेच अभिनेत्रीने या डान्स व्हिडीओला “चूक- भूल द्यावी घ्यावी…” असं उपरोधिक कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्या महत्त्वाची भूमिका साकारत असलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता त्या पुन्हा एकदा कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader