Aishwarya Narkar : ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याचं यंदा २५ वं वर्ष होतं. या पुरस्कार सोहळ्यात सध्या वाहिनीवर सुरू असणाऱ्या अनेक कलाकारांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय ‘आभाळमाया’ सारख्या अजरामर मालिकेतील प्रसिद्ध कलाकार सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते. यावर्षी सर्वोत्कृष्ट खलनायिका होण्याचा मान ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील भुवनेश्वरीला मिळाला. मात्र, या कॅटेगरीत ऐश्वर्या नारकर यांना देखील नामांकन मिळालं होतं.

ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत आधी रुपाली आणि सध्या शतग्रीव हे खलनायिकेचं पात्र साकारत आहेत. त्यांच्या भूमिकेची वैविध्यपूर्णता पाहता हा पुरस्कार ऐश्वर्या नारकरांना मिळणं जास्त अपेक्षित होतं असं मत त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केलं आहे. मात्र, अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या चाहत्यांना अभिनेत्रीने दिलेलं उत्तर सध्या लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा : रिंकू राजगुरुने ‘लापता लेडीज’च्या मंजू माईला भेट दिली सुंदर साडी! दोघींनी ‘या’ चित्रपटात केलंय एकत्र काम, तुम्हाला माहितीये का?

ऐश्वर्या नारकरांचं नेटकऱ्याला उत्तर

ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर त्या अनेकदा ‘आस्क मी सेशन’ घेतात. या सेशनमध्ये अभिनेत्रीचे चाहते त्यांना विविध प्रश्न विचारतात. या सगळ्या प्रश्नांची ऐश्वर्या नारकर अगदी दिलखुलासपणे उत्तरं देतात. नुकत्याच घेतलेल्या ‘आस्क मी सेशन’मध्ये ऐश्वर्या नारकर यांना ‘झी मराठी’ पुरस्कारासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

“खलनायिकेचा पुरस्कार तुम्हाला मिळाला पाहिजे होता.. म्हणजेच शतग्रीवला…तुम्ही खूप छान काम करता” असं सारखंच मत अभिनेत्रीच्या दोन चाहत्यांनी व्यक्त केलं होतं. यातील पहिल्या पोस्टवर ऐश्वर्या यांनी ‘hmmm’ लिहित पुढे हसण्याचा इमोजी दिला. तर, दुसऱ्या पोस्टवर “तुम्हाला हा पुरस्कार मला मिळावा हे वाटलं हेच माझ्यासाठी अवॉर्ड आहे” असं लिहितं अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 Aishwarya Narkar
ऐश्वर्या नारकर यांचं नेटकऱ्याला उत्तर ( Aishwarya Narkar )

हेही वाचा : Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

Aishwarya Narkar
ऐश्वर्या नारकर यांचं नेटकऱ्याला उत्तर ( Aishwarya Narkar )

ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) यांनी खिलाडूवृत्ती बाळगून ज्याप्रकारे आपल्या चाहत्यांना उत्तर दिली याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, आजवर या अभिनेत्रीने मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.