Aishwarya Narkar on Rising divorce: ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे अभिनयाबरोबरच त्यांच्या सोशल मीडियावरील रील्समुळेदेखील चर्चेत असतात. आता एका मुलाखतीत या सेलिब्रिटी जोडप्याने समाजात वाढत्या घटस्फोटावर वक्तव्य केले आहे.
“पटलं नाही, तर घटस्फोट…”
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावर वक्तव्य केले. ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “आजकाल हे खूप सोपं झालंय. यापूर्वी आमच्या आधीच्या किंवा आमच्या पिढीमध्ये घटस्फोट हा पर्यायच उपलब्ध नव्हता. क्वचित वेळा असं व्हायचं की एखाद्या लग्नात खूप समस्या आहेत म्हणून घटस्फोट व्हायचा.”
“आजकाल सहजपणे उपलब्ध होणारे पर्याय आहेत. म्हणजे पटलं नाही, तर घटस्फोट घेतात, काही छोट्या छोट्या गोष्टीत पटलं नाही, तर आपण एकमत करण्याचा प्रयत्न करीत नाही. पटत नाही, आपण एकत्र नको राहूयात, हा एक पर्याय आहे. तो पर्याय डोळ्यांसमोर धरूनच काही काही वेळेला लिव्ह इन रिलेशनशिपमधून लग्न केलं जातं. त्यावेळी असा विचार केला जातो की, लग्न करून बघू, नाही पटलं तर बाजूला होऊ. पण ती कमिटमेंट, कुटुंब व्यवस्था, त्या कुटुंब व्यवस्थेवरील विश्वास, हे कुठेतरी खूप लांब चाललंय. ते जपलं गेलं पाहिजे.”
“आताच्या पिढ्या एकमेकांचे पटत नसेल, तर वेगळे राहण्याचा निर्णय घेतात. पण ते वेगळं होण्यामध्ये दोन कुटुंबं उद्ध्वस्त होतात. त्यांची वाट लागते. काहीतरी सामोपचारानं होऊ शकतं. यावर काहीतरी पर्याय असू शकतो हा विचारच केला जात नाही. आता प्रत्येकजण स्वतंत्र आहे, स्वत:च्या पायावर उभी आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे. पण, त्यामुळे एकमेकांचा आधार घेऊयात, हा पर्याय उरला नाहीये. माझी मी पुढे जाऊ शकते. तुझी काही गरज नाही, आधार नको, असं होतं.”
“जसं प्रेमात ब्रेकअप होतं ना, तसे हल्ली घटस्फोट होतात. प्रेम नाही, तर चला ब्रेकअप करूया, असं असतं. आता तसंच लग्नात पटत नसेल, तर घटस्फोट घेऊ इतकं ते सोपं झालं आहे. जे खरं तर फार चुकीचं आहे.” पुढे अविनाश नारकर म्हणाले, “आपण जास्त प्रॅक्टिकल होत चाललो आहोत. भावनिक स्तर विरळ होत चाललेला आहे.”
दरम्यान, अविनाश नारकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत आणि ऐश्वर्या नारकर याआधी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत दिसल्या होत्या.