‘या सुखांनो या’, ‘स्वामिनी’, ‘लेक माझी लाडकी’, ‘तुम ही हो बंधु सखा तुम्ही’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांना ओळखलं जातं. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने त्या नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेतात. छोट्या पडद्यावर त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय ऐश्वर्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.
ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या किंवा ट्रेडिंग असणाऱ्या गाण्यांवर नेहमीच विविध डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर त्यांना या डान्स व्हिडीओमध्ये उत्तम साथ देत असल्याचं पाहायला मिळतं. या जोडप्याच्या व्हिडीओवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात. परंतु, अनेकदा त्यांना यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशा नेटकऱ्यांना अभिनेत्रीने आजवर अनेकदा स्पष्ट शब्दात उत्तर देत सुनावलं आहे.
हेही वाचा : Happy Birthday ताई! गौतमी देशपांडेने लाडक्या बहिणीसाठी शेअर केला मजेशीर व्हिडीओ, मृण्मयीबद्दल म्हणाली…
ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट
ऐश्वर्या नारकरांनी नुकताच इन्स्टाग्रामवर मेकअप करतानाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांची सहकलाकार तितीक्षा तावडे सुद्धा आहे. या व्हिडीओवर एका युजरने खोचक कमेंट केली आहे. अभिनेत्रीच्या मेकअप करतानाच्या या व्हिडीओवर एक नेटकरी लिहितो, “थोडं शेण लावा ना…छान दिसेल” या कमेंटच्या पुढे संबंधित युजरने हसण्याचे इमोजी सुद्धा जोडले आहेत.
ऐश्वर्या नारकरांनी या व्हिडीओच्या कमेंटचा स्क्रीनशॉट त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत “तुम्ही रोज लावता का?” असा प्रश्न करत या नेटकऱ्याला स्पष्ट भाषेत उत्तर दिलं आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या चाहत्यांनी सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये संबंधित युजरला खडेबोल सुनावले आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. नुकत्याच त्या शूटिंगमधून वेळात वेळ काढून पती अविनाश नारकर यांच्याबरोबर पाचगणी फिरायला गेल्या होत्या. त्या नेहमीच विविधांगी भूमिका साकारून व सोशल मीडियावर नवनवीन रील्स शेअर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात.