Aishwarya Narkar : मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली हे खलनायिकेचं पात्र साकारत आहेत. लवकरच हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेईल असं अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत आता विरोचकाचा मृत्यू होणार आहे. त्यामुळे मालिकेतून रुपालीची एक्झिट होईल का? असा प्रश्न ऐश्वर्या नारकरांना ‘अल्ट्रा मराठी बझ’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला यावर त्या म्हणाल्या, “रुपाली पात्राची कन्फर्म एक्झिट आहे…यानंतर रुपाली परत येणार नाही…विरोचक सुद्धा मरेल. पण, यापुढचा मालिकेतील ट्रॅक खूप जास्त उत्सुकता वाढवणारा आहे. कारण, नेत्राच्या गर्भात विरोचकाचा अंश आहे. त्यामुळे विरोचकाचं जे म्हणणं आहे… तो मेल्यावरही अमर राहणार… ते कुठेतरी खरं ठरणार आहे. रुपालीची एक्झिट या सगळ्या सीक्वेन्सनंतर कन्फर्म आहे.”
हेही वाचा : “जॅकी श्रॉफ वाईट अभिनेता, तर शत्रुघ्न सिन्हा…”, निर्माते सुभाष घई यांचं स्पष्ट मत; शाहरुख खानबरोबरच्या भांडणाबद्दल म्हणाले…
ऐश्वर्या नारकर रुपालीच्या भूमिकेला करणार मिस ( Aishwarya Narkar )
ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) रुपाली या भूमिकेला मिस करण्याबद्दल म्हणाल्या, “माझी भूमिका खरंच खूप चांगली होती. कोणत्याही मालिकेतली माझी भूमिका जेव्हा संपते तेव्हा मला खरंच खूप जास्त वाईट वाटतं. तो माझ्यासाठी खूप भावुक क्षण असतो. सकारात्मक – नकारात्मक कोणतीही भूमिका असली तरीही भावुक व्हायला होतं. कारण, ती भूमिका आपण जगत असतो. त्यामुळे प्रवास शेवटाकडे येतो तेव्हा खूप त्रासदायक होतं.”
“मालिका करताना तुमची टीम चांगली असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून येतात. या मालिकेची मुळात गोष्टच वेगळी होती. ही एक काल्पनिक गोष्ट होती. मला मजा आली…आम्ही ऑफस्क्रीन सुद्धा खूप धमाल केली. लंच ब्रेकमध्ये, सेटवर आम्ही रील्स बनवल्या. आम्ही प्रत्येकाने प्रत्येक क्षण एन्जॉय केला. त्यामुळे सेटवरचं सगळं मी मिस करणार आहे.” असं ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं.
दरम्यान, ऐश्वर्या नारकर उत्तम अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावर विविध रील्स देखील बनवत असतात. मालिकेच्या सेटवरचे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्यासह या मालिकेत तितीक्षा तावडे व अजिंक्य ननावरे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहे.