Aishwarya Narkar : अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी गेली अनेक वर्षे छोट्या पडद्यावर आपलं अधिराज्य गाजवलं आहे. सध्या त्या अभिनयाच्या जोडीने सोशल मीडियावरील व्हायरल गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवत असतात. ऐश्वर्या व त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर यांचे डान्स व्हिडीओ देखील सर्वत्र तुफान व्हायरल होत असतात. मात्र, अनेकदा अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यांच्या व्हिडीओ किंवा फोटोंवर युजर्स नकारात्मक कमेंट्स करतात. या सगळ्या ट्रोलर्सला अभिनेत्री स्पष्ट शब्दांत उत्तर देत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं.

ऐश्वर्या नारकरांनी नुकतंच सुंदर अशी ऑफ व्हाइट साडी नेसून नदीकिनारी फोटोशूट केलं आहे. या फोटोवर एका नेटकऱ्याने निगेटिव्ह कमेंट केली होती. संबंधित युजरने अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत, “आता चित्रपट करून पैसे येणं बंद झालं. कारण, आता चित्रपट घेऊन कोण येतच नाही. मग आता आर्थिक साधन म्हणून हा मार्ग निवडलाय. आपण काही वर्षांपूर्वी लहान – थोरांचे, तरुणांचे, महिलांचे आदर्श आणि आवडते कलाकार होतो या भावनेची कदर करा.” असं लिहिलं होतं.

ऐश्वर्या नारकरांनी या कमेंटचा स्क्रीनशॉट त्यांच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर करत संबंधित युजरला चांगलंच खडसावलं आहे. “आता चित्रपट करून पैसे येणं बंद झालं” असं म्हणणाऱ्या नेटकऱ्याच्या कमेंटला उत्तर देत अभिनेत्री लिहितात, “आपल्या अगाध ज्ञानाबद्दल काय बोलावं? स्वत:ची अक्कल पाझळण्याआधी जरा माहिती करून घ्यावी…” या स्टोरीमध्ये अभिनेत्रीने संबंधित युजरला टॅग सुद्धा केलं आहे.

ऐश्वर्या नारकरांनी ( Aishwarya Narkar ) यापूर्वी सुद्धा असंख्य नेटकऱ्यांना स्पष्ट शब्दांत उत्तरं देत आपली बाजू मांडली आहे. दरम्यान, त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांना मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा मनोरंजन विश्वात उमटवला आहे.

aishwarya narkar
ऐश्वर्या नारकर यांची पोस्ट ( aishwarya narkar )

काही दिवसांपूर्वीच त्यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता ऐश्वर्या नारकर येत्या काळात आणखी कोणत्या भूमिकेत झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader