Aishwarya Narkar : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे मराठी इंडस्ट्रीतली एव्हरग्रीन जोडी म्हणून पाहिलं जातं. या जोडप्याने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. संसार सांभाळून सिनेविश्वात या दोघांनीही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्या व अविनाश यांच्या एकुलत्या एक मुलाचं नाव अमेय नारकर असं आहे. तो नेमकं काय करतो? अमेय त्याचं उच्च शिक्षण कोणत्या क्षेत्रात पूर्ण करतोय याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
ऐश्वर्या नारकर लेकाबद्दल म्हणाल्या, “माझा मुलगा या फिल्डमध्येच काम करणार आहे. पण, त्याने या फिल्डमध्ये येण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझं इतकंच म्हणणं होतं की, तू या क्षेत्रातलं व्यवस्थित शिक्षण घेऊन मग काम सुरू कर…कारण आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा असं काहीच नव्हतं, ती परिस्थिती वेगळी होती. आम्ही सुरुवात केली होती तेव्हा आधी नाटक केलं, मग मालिका मिळाल्या…पुढे याच क्षेत्रात काम करत राहिलो पुढे, आम्हाला लोकप्रियता मिळाली पण, आता असं नाहीये. त्यामुळे तू पूर्ण अभ्यास करून या फिल्डमध्ये ये इतकंच मी त्याला सांगितलं.”
अमेय नारकर परदेशात पूर्ण करतोय शिक्षण
ऐश्वर्या नारकर पुढे म्हणाल्या, “रुईयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिका केल्या आहेत. मग हळुहळू त्याला या कामाची मजा येऊ लागली. पुढे, त्याने ललितला MA पूर्ण केलं. आता तो बाहेरगावी पुढील शिक्षणासाठी गेला आहे. तिकडची वेगवेगळी थिएटर्स त्याला शिकायची आहेत. पण, त्या व्यतिरिक्त कॅमेऱ्याशी संबंधित वगैरे गोष्टी सुद्धा त्याला नव्याने शिकायला मिळत आहेत. आता तो पूर्ण अभ्यास करून या क्षेत्रात येईल. शिक्षण घेऊन परतल्यावर तो अभिनय करेल की, दिग्दर्शनात पुढे जाईल हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. कारण, या शिक्षणाच्या प्रक्रियेत त्याला कोणत्या गोष्टीची आवड निर्माण झालीये हे महत्त्वाचं आहे.”
हेही वाचा : स्मिता पाटील यांची सावत्र मुलगी आहे ‘या’ अभिनेत्याची दुसरी बायको; राज बब्बर यांची लेक पतीबद्दल म्हणाली…
“आतापर्यंत त्याला अनेक कामांसाठी विचारणा झालीये. तुझ्या लेकाला या भूमिकेसाठी विचार ना…करतोस का मालिका वगैरे, पण, आमचं म्हणणं हेच होतं की, असं नको. तू या सगळ्याचं शिक्षण घेऊन छान तयार हो, अभ्यास कर आणि मग तू तुला योग्य वाटेल ते कर. आता आम्ही दोघं अजूनही काम करतोय. त्यामुळे अमेय सेटल होईपर्यंत आम्ही थांबू शकतो..असं नाहीये की, त्याला लगेच पैसे कमावणं गरजेचं आहे. आम्ही त्याची स्पेस त्याला दिली आहे. त्याला पीएचडी पण पूर्ण करायचीये, अभिनय सुद्धा करायचाय, त्याला टिचिंग, दिग्दर्शनाची सुद्धा आवड आहे. आता या सगळ्यात तो काय निवडतो हे आम्हाला दोन वर्षांनी कळेल.” असं ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं.